Baramati Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), भाजप उमेदवार कांचन कुल (Kanchan Kool), वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार नवनाथ पडळकर यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) म्हणजे शरद पवार (Sharad Pawar)आणि शरद पवार म्हणजे बारामती (Baramati), असे समिकरण जन्माला येऊन आता कित्येक वर्षे झाली. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत होते. शदर पवार यांनी 2009 मध्ये माढा येथून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व केले. 2009 ते आतापर्यंत सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरुन निवडणूक लढवत आहेत आणि निवडूनही येत आहेत. विरोधकांनी जंग जंग पछाडूनही हा मतदारसंघ त्यांना पवार आणि कुटुंबियांकडून खेचता आला नाही. लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपने आता कांचन कुल (Kanchan Kool) यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत जनता काय कौल देते याचीच आता उत्सुकता. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार नवनाथ पडळकर हे देखील रिंगणात आहेत.
लोकसभा निवडणूक 2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी लाट असतानाही सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्या वेळी (2014) मध्ये त्यांना 69 हजार 719 इतके मताधिक्य मिळाले होते. 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, तसेच सुरेश खोपडे हे देखील रिंगणात होते. त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 5 लाख 21 हजार 562, महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 तर, सुरेश खोपडे यांना 26 हजार 396 इतकी मते मिळाली होती. (हेही वाचा, माढा लोकसभा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय शिंदे विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर काट्याची टक्कर)
बारामती लोकसभा मतदारसंघात येणारे मतदारसंघ
- दौंड विधानसभा मतदारसंघ
- इंदापूर विधानसभा मतदारसंघ
- बारामती विधानसभा मतदारसंघ
- पुरंदर विधानसभा मतदारसंघ
- भोर विधानसभा मतदारसंघ
- खडकवासला विधानसभा मतदारसंघ
दरम्यान, या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघातून सामना सुप्रिया सुळे विरुद्ध भाजप उमेदवार कांचन कुल असा आहे. तर वंचित बहुजन आघाडी उमेदवार नवनाथ पडळकर हे देखील येथे रिंगणात आहेत. भाजपचे स्टार प्रचारक कांचन कुल यांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघात येऊन गेले आहेत. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.