कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात लॉक डाऊन (Lockdown) सुरु असताना, आज मुंबईमध्ये (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली. शहरातील बांद्रा (Bandra) स्टेशनबाहेर हजारो परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी जमा झाले होते. या प्रकरणी मुंबईतील मजुरांविषयी सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट लिहिणाऱ्या विनय दुबेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विनय दुबेला (Vinay Dubey) नवी मुंबई पोलिसांनी ऐरोली येथून ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. विनय दुबेनेच सोशल मिडीयावर एक पोस्ट लिहित व व्हिडिओ शेअर करत लोकांना एकत्र जमण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आत लॉक डाऊन फेज 1 संपल्यावर साधारण 2 हजार कामगार बांद्रा स्टेशनबाहेर एकत्र आले होते.
A man, Vinay Dubey has been detained by Navi Mumbai Police in Airoli for threatening a huge protest by migrant labourers in Kurla, Mumbai on 18th April. He has been handed over to Mumbai Police: Navi Mumbai Police #Maharashtra
— ANI (@ANI) April 14, 2020
कोरोना विषाणू संक्रमणाची वाढती संख्या पाहून देशातील लॉक डाऊन कालावधी 3 मे पर्यंत वाढविला गेला आहे. अशात काम-धंद्याविना मुंबई शहरात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत जायचे होते. मात्र केंद्र व राज्य सरकार यासाठी परवानगी देत नव्हते. त्यात विनय दुबे याने लोकांना भडकवणाऱ्या पोस्ट लिहिल्या, व्हिडिओ शेअर केले. त्यानुसार 18 एप्रिल पर्यंत लोकांनी कुर्ला टर्मिनस येथे जमण्याचे आवाहन केले गेले. विनय दुबे ही व्यक्ती मुंबईत सोशल मीडियावर 'चलो घर की ओर' नावाची मोहीम चालवित होती. (हेही वाचा: मुंबईच्या बांद्रा परिसरात उसळलेल्या गर्दीसाठी Aaditya Thackeray यांनी केंद्र सरकारला ठरवले जबाबदार)
त्यानुसार आज हजारोंच्या संख्येने लोक लॉक डाऊनचा फज्जा उडवत बांद्रा इथे एकत्र आले होते. या लोकांना पांगवण्यासाठी व गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी काही प्रमाणात बळाचा वापर करून सध्या तरी ही गर्दी हटवली. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हा जमाव एकत्र आलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याचे उत्तर या विनय दुबे याच्या पोस्टमध्ये मिळाले आहे. बांद्रा येथे घडलेल्या घटनेसंदर्भात 800-1000 अज्ञात लोकांविरोधात, आयपीसी कलम 143, 147, 149, 186, 188 अन्वये बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विनय दुबे विरोधात मुंबई पोलिसांनी कलम-188 आणि साथीचा आजार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.