
वांद्रे कोर्टात (Bandra Court) शनिवारी, 18 जानेवारी रोजी एका सुनावणी दरम्यान अचानक 'ये अंधा कानून है' (Ye Andha Kanoon Hai) हे गाणं वाजायला लागलं आणि कोर्टात एकच गोंधळ सुरु झाला. सुरुवातीला या गाण्याचं टायमिंग ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला पण नंतर हा आवाज नेमका येतोय कुठून ते कळत नसल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली होती. थोड्यावेळ शोधाशोध केल्यांनतर अखेरीस कोर्टात पडलेल्या एका निळ्या रंगाच्या बॅगेतून हा आवाज येत असल्याचे समजले, आता ही अज्ञात बॅग नेमकी कोणाची हे शोधण्यापासून ते पुढे त्यात नेमकं आहे काय याचा छडा लागेपर्यंत न्यायाधीशांच्या सहित आरोपी, वकील व उपस्थित सर्वच भीतीने पाणी पाणी झाले होते. (ठाणे न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांना चप्पल मारून केला शिवीगाळ, वाचा नेमकं घडलं काय)
मिड डे च्या वृत्तानुसार, कोर्टात ज्या निळ्या रंगाच्या बॅगेतून या गाण्याचा आवाज येत होता नेमका त्याच बागेवर पोलिसांना बॉम्ब लिहिलेली एक चिठ्ठी सापडली ज्यामुळे तणावात आणखीनच भर पडली. समयसूचकता दाखवून यावेळी पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथकाला कोर्टात पाचारण केले आणि तपास सुरु झाला. अखेरीस या पथकाच्या तपासात मात्र काहीच सापडले नाही . हे कोण्या अज्ञात व्यक्तीचे भीती पसरवण्यासाठी केलेले काम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
दरम्यान, यापूर्वी अनेकदा कोर्टाच्या सुनावणीत अनेक विचित्र प्रकार घडले आहेत, कधी न्यायधीशाना चप्पल फेकून मारण्यापासून ते आरडाओरडा करेपर्यंत ही उदाहरणे अनेकदा समोर आली आहेत, मात्र यावेळेस घडलेला हा प्रकार केवळ विचित्रच नव्हे तर भीतीदायक देखील होता असे म्हणायला हवे.