नारायण राणे (Narayan Rane), शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचे एकेकाळचे एकनिष्ठ सहकारी. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये फारकत होऊन नारायण राणे शिवसेनेमधून बाहेर पडले. पुढे त्यांनी आपला स्वतंत्र पक्षदेखील स्थापन केला. आता नारायण राणे प्रकाशझोतात आले आहेत ते त्यांच्या आत्मचरित्रामुळे. ‘नो होल्ड्स बॅरेड’ (No Holds Barred) या नावाने हे इंग्रजी भाषेतील आत्मचरित्र वाचकांच्या भेटीला आले आहे. या आत्मचरित्रात नारायण राणे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळातही या पुस्तकाची मोठी चर्चा रंगली आहे.
सध्या या पुस्तकाच्या इंग्रजी भाषेवरून नारायण राणे यांना ट्रोल केले जात आहे. अशात प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला, नारायण राणे यांच्या इंग्रजीचा एक किस्सा चर्चेत आला आहे. या गोष्टीचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
नारायण राणे मुख्यमंत्री असताना बेस्टमध्ये मीटर बसवण्याची कल्पना होती, याबाबत माहिती मिळवण्यासाठी परदेशातील एका व्यक्तीला वर्षा बंगल्यावर पाचारण करण्यात आले होते. ती व्यक्ती त्या प्रकल्पाबाबत अस्खलित इंग्रजीमध्ये माहिती देत होती, मात्र नारायण राणे यांना त्यातील एकही गोष्ट कळाली नसल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले होते, मात्र या इंग्रजी मुळे जी पंचाईत झाली ती एका भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी कथन केली आहे.
दरम्यान, नारायण राणे यांचे शिवसैनिक ते भाजप खासदार असे 12 टप्पे या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. हे मूळ इंग्रजी पुस्तक हार्पर कॉन्सिलने प्रकाशित केले आहे. याची मराठी आवृती लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा आहे.