Bala Nandgaonkar on Security Reduction: राज ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय सरकारचे 'खुजेपण' ठळकपणे दाखविणारा आहे- बाळा नांदगावकर
Bala Nandgaonkar and Raj Thackeray (Photo Credits: FB and PTI)

महाराष्ट्र सरकारने (State Government) मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेत सर्व राजकीय वातावरण ढवळून टाकले आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची सुरक्षेमध्ये कपात करून अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा देखील समावेश आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे मनसैनिक पेटून उठले असून अनेक मनसे नेत्यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. यात मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी देखील सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. "राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी त्यांची सुरक्षा कमी करणे हा निर्णय सरकारचे 'खुजेपण' दाखवणारे आहे" अशी टिका त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे. या संदर्भातील एक पोस्ट त्यांनी फेसबुक पेजवर शेअर केले आहे.

'ये पब्लिक है ये सब जानती है' असे लिहत त्यांनी हे भले मोठे पोस्ट केले आहे. "सरकार ने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली त्यात राजसाहेब यांचे हि नाव आले. सरकार कोणाचे ही असो वास्तवाचे भान ठेवुन असे निर्णय घ्यायला हवे. राज्यातील जनतेसाठी सतत उपलब्ध असणारा नेता , स्वतःच्या पक्षाचा फायदा नुकसान याचा विचार न करता स्पष्ट भूमिका घेणारा नेता , सामान्य लोकांच्या भल्यासाठी अनेकांशी भिडणारा नेता म्हणून राजसाहेब पूर्ण राज्याला माहीत आहे. साहेबांच्या रोख ठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही" असे बाळा नांदगावकर म्हणाले.हेदेखील वाचा- Devendra Fadnavis On Security: मी प्रदेशाध्यक्ष असताना देखील कधीच सुरक्षा मागितली नव्हती- देवेंद्र फडणवीस

"साहेबांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

"सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील 10 बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती" असे सांगत भंडारा येथील दुर्दैवी घटनेवर देखील निदर्शनास आणून दिली आहे.

सरकार ने जनतेला गृहीत धरू नये, ये पब्लिक है ये सब जानती है असं म्हणत बाळा नांदगावकरांनी सरकारवर कडक शब्दांत टिका केली आहे.