Bademiya (संग्रहित संपादित प्रतिमा)

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे असलेले ‘बडे मियाँ’ (Bademiya) हे लोकप्रिय रेस्टॉरंट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बुधवारी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत इथे छापा टाकला व त्यानंतर हे रेस्टॉरंट सील केले. स्वच्छतेबाबत आलेल्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रेस्टॉरंटच्या किचनमध्ये झुरळ आणि उंदीर आढळून आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे या 76 वर्ष जुन्या रेस्टॉरंटकडे FSSAI परवानाही नव्हता.

कुलाब्यातील एका छोट्या कबाबच्या दुकानातून या रेस्टॉरंटचा प्रवास सुरू झाला आणि आज ते मुंबईतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेले हे रेस्टॉरंट आज इतके खास बनले आहे की, अनेक प्रसिद्ध व्यक्ती इथल्या फ्लेवर्सचा आस्वाद घेण्यासाठी येतात. कुलाबा हा मुंबईचा एक पॉश परिसर आहे. येथे गेटवे ऑफ इंडिया तसेच ताजमहाल हॉटेल आहे.

बडे मियाँची सुरुवात मोहम्मद यासीन यांनी 1946 मध्ये एक लहान कबाब शॉपद्वारे केली होती. वयाच्या 13 व्या वर्षी यासिन बिजनौरहून मुंबईत आले आणि वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी कुलाब्यातील ताज हॉटेलच्या मागे कबाबचे दुकान उघडले. यासिनचे गुरू हजरत मोहम्मद आदम चिश्ती यांनी त्यांना 20 रुपये भेट म्हणून दिले होते आणि यासीन यांनी याच पैशातून कबाब कॉर्नर सुरू केला. यासीन यांना दाढी होती आणि तिथे येणारे लोक त्यांना प्रेमाने मियाँ म्हणत. जेव्हा त्यांची दाढी वाढली तेव्हा लोक त्यांना बडे मियाँ म्हणू लागले. अशा प्रकारे दाढीसोबतच यासिनची लोकप्रियताही वाढली. रेस्टॉरंटचे मालक आणि मोहम्मद यासीन यांचे नातू सलमान शेख सांगतात की बडे मियाँने सिगडी आणि सीख कबाबपासून सुरुवात केली होती.

सुरुवातीला याला फारसे यश मिळाले नाही, मात्र हळूहळू कबाबच्या वासामुळे ग्राहक येऊ लागले. आधी नौदलाचे जवान इथे येऊ लागले आणि नंतर सामान्य लोकही बडे मियाँकडे वळू लागले. जसजसा व्यवसाय वाढत गेला तसतसे बडे मियाँ यांनी चिकन टिक्का आणि मटणाचे पदार्थ बनवायला सुरुवात केली. यानंतर रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी आणि बैदा रोटी बनवली जाऊ लागली. इथली चिकन आणि मटण बायडा रोटी खूप प्रसिद्ध आहे. सलमान शेख सांगतात की त्यांच्याकडे असे अनेक ग्राहक येतात जे आजोबांच्या काळापासून इथले नियमित ग्राहक आहेत. चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटीही बडे मियाँमध्ये वरचेवर येतात. मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये राहणारे अनेक ग्राहक बडे मियाँ यांच्याकडून जेवण ऑर्डर करतात. (हेही वाचा: मुलाच्या डायपरमध्ये लपवून आणली 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची गोल्ड डस्ट पावडर; मुंबई विमानतळावरील घटना)

आता बडे मियाँ आउटलेटवर बुधवारी संध्याकाळी अचानक छापा टाकण्यात आला. त्यांच्या सर्व आऊटलेट्सकडे ऑपरेट करण्याचा परवाना नसल्याचे दिसून आले.  नव्हता. यासह इथल्या किचनमध्ये झुरळ आणि उंदीरही आढळून आले. एफडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ते रेस्टॉरंटला पूर्णतः काम थांबवण्याची नोटीस जारी करणार आहेत आणि पुढील कारवाई केली जाईल. अजूनही याबाबतची तपासणी सुरू आहे.