
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन (Babanrao Dhakne Passed Away) झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. खासगी रुग्णालयात आज (27 ऑक्टोबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधल्या काळात त्यांची प्रकृती काहीशी खालावली होती. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचणीत त्यांना न्यूमोनीयाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांना अमदनगर (Ahmednagar) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्याच्या राजकारणातील एक संघर्षशील नेता आपण गमावल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. अहमदनगर, बीड आणि एकूणच मराठवाड्यामध्ये दांडगा लोकसंपर्क, राजकीय अनुभव आणि विविध विषयांचे व्यासंगी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे.
बबनराव ढाकणे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु केलेला राजकीय प्रवास, पुढे त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन गेला. ते केंद्रीय मंत्री देखील राहिले. खास करुन वांबोरी चारीसाठी त्यांनी सलग 20 वर्षे दिलेला लढा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांना जनतेचे विशेष प्रेम लाभले. कामाचा माणूस म्हणून जनतेने लोकवर्गणी काढून विधानसभा निवडणूक 1978 मध्ये त्यांना निवडून दिले. ते पहिल्यांदा आमदार झाले. पाथर्डी तालुक्याच्या मूलभूत प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी राज्याच्या सार्वभौम सभागृहात पत्रके फेकली होती. त्यासाठी त्यांना सत्ताधारी पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य असतानाही सात दिवसांचा तुरुंगवास झाला. उल्लेखनीय असे की, पुढे त्याच सार्वभौम सभागृहाचा सदस्य होण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. सन 1981 ते 1982 या काळात राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांनी मोठ्या ताकदीने भुषवले.
बॅरिष्टर अब्दुल रेहमान अंतुले आणि बाबासाहेब भोसले या दोन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून जबाबादारी पार पाडली. त्यांच्या अनेक कहाण्या आजही त्यांचे समकालीन आणि राजकीय अभ्यासक सांगतात. मंडल आयोगाच्या शिफारशी राज्य सरकारने तत्काळ स्वीकाराव्यात ही त्यांची मागणी होती. मागणी अधिक लावून धरण्यासाठी त्यांनी मुंबई येथील राज्यविधमंडळाच्या अधिवेशनात 25 जुलै 1983 रोजी चक्क विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंडच पळवला होता.
एक्स पोस्ट
अहमदनगर -
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन
वयाच्या 86 व्या वर्षी घेतला खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास
अहमदनगर, बीड जिल्ह्यात ढाकणे यांचा दांडगा जनसंपर्क होता#babanraodhakne#बबनरावढाकणे
— Pramod Jagtap (@PramodSJagtap) October 27, 2023
आपल्या एकूण राजकीय कारकीर्दीत ढाकणे यांनी जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि शेवटी बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार आणि पुढे केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्या राजकीय कार्यकाळात त्यांनी शेगाव पाथर्डी येथे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना उभारला.