Baba Siddique to Join NCP: कॉंग्रेसची 48 वर्षांची साथ सोडणं वेदनादायी, पण काही गोष्टींवर न बोलणंचं योग्य; 'वरिष्ठां'बाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत बाबा सिद्दीकी यांनी जाहीर केला एनसीपी पक्ष प्रवेशाचा निर्णय
Baba Siddique Ajit Pawar | Twitter

लोकसभा निवडणूकांपूर्वी महाराष्ट्रातही कॉंग्रेस  पक्षाला सुरूंग लागला आहे. मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ 48 वर्ष कॉंग्रेस पक्षासोबत काम केलेले नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी आज पक्षाला रामराम ठोकला आहे. आपण हा निर्णय 15 दिवसांपूर्वीच पक्षाला कळवला असल्याचं सांगितलं आहे. कॉंग्रेसची 48 वर्षांची साथ सोडण्याचा निर्णय हा वेदनादायी आहे. दु:ख झालं नसेल तर मन मेल्यासारखं आहे. पण घरातल्या काही गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात त्यामुळे पक्ष सोडत असल्यामागील कारण सांगू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज सकाळी X  वर राजीनामा दिल्याचं सांगितल्यानंतर ते मीडीयाशी बोलत होते यावेळी त्यांनी पक्षात काहींनी माझी कोंडी केली आणि ती जबरदस्त होती असं म्हटलं. यावेळी कुणाबद्दलही ते थेट बोलले नाही पण हा प्रकार महाराष्ट्रातून झाला नसल्याचं म्हटलं आहे. मात्र मल्लिकार्जून खरगे आपल्यासाठी पित्यासमान असल्याचं बाबा सिद्दीकी म्हणाले आहे.  आपण पूर्वीपासूनच अजित पवार यांचे प्रशंसक होतो त्यामुळे आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली 10 फेब्रुवारी दिवशी एनसीपी मध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचं बाबा सिद्दीकी यांनी जाहीर केलं आहे.

वांद्रे पूर्व भागामध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आले आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळेस आपल्यासोबत काही नेते असतील असे ते म्हणाले आहेत. दरम्यान 'आगे आगे देखो होता है क्या...' असं म्हणत अजूनही काही गोष्टी गुलदस्त्यामध्ये ठेवल्या आहेत. 10 फेब्रुवारीच्या सभेला अजित पवार देखील येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Baba Siddique On meeting With Ajit Pawar: 'अजित पवार आमचे नेते नाहीत हे पाहून आमचं दुर्भाग्य ...' पहा बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या चर्चांवर काय म्हणाले?

झीशान सिद्दीकी यांचं काय?  

बाबा सिद्दीकी यांंचा लेक झीशान वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार आहे. झीशान बाबत बोलणं बाबांनी टाळलं आहे. त्यांनी तो प्रौढ आहे. राजकारणातही 10-12 वर्ष आहे. युवा कॉंग्रेसचा त्याला अनुभव आहे अशावेळी त्याचा निर्णय तो घेऊ शकतो असं म्हटलं आहे. दरम्यान झीशान विद्यमान आमदार असल्याने दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्यासाठी आता त्याला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे झीशनच्या पक्ष प्रवेशाबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

बाबा सिद्दीकी यांनी अमीन पटेल स्वतःची बाजू मांडू शकतात  असं म्हणत त्यांच्याबद्दलही थेट काही म्हणाले नाहीत पण महाविकास आघाडीला आपल्या शुभेच्छा राहतील असे म्हणत त्यांनी कोणारही थेट आरोप करणं टाळलं आहे. सिद्दीकी कुटुंबाचे अनेक बॉलिवूड कलाकारांशी जवळचे संबंध आहेत.