अवनीचे बछडे शेवटी सापडलेच...
अवनी (T-1) वाघीण बछडे ( फोटो सौजन्य- Pixabay)

काही महिन्यांपूर्वी अवनी (T-1) या नरभक्षक वाघिणीला शोधण्याची मोहिम जोरदार सुरु झाली होती. तसेच तिला पकडण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर अखेर ती जाळ्यात सापडली तेव्हा तिला गोळ्या झाडून ठार मारण्यात आले.

मात्र अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्यांची चिंता सर्वांना लागून राहिली होती. अखेर तिच्या बछड्यांना पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाला दिसल्याचा दावा केला जात आहे. नरभक्षक अवनीला गोळ्या झाडून मारल्याने देशभरातून महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तर सुरुवातीला अवनीचे बछडे बेपत्ता झाल्याने वनविभागाला सुळावर चढविण्यात आले होते. अखेर त्यांना विहिरगाव येथे हे दोन बछडे दिसल्याचे सांगण्यात येत आहेत.

तर नक्की हे अवनीचेच बछडे आहेत का याबद्दल अजून कोणताही पाठपुरावा केलेला नाही आहे. तसेच चंद्रपूरमध्ये जुनोना जंगलात दोन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.