Aurangabad Name Change: महानगरपालिका निवडणूकांपूर्वी औरंगाबादचे नामांतर होणार; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दावा
Chandrakant Khaire (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा (Aurangabad Name Change) मुद्दा चांगलाच पेटला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकमत नसल्याचे दिसत आहे. मात्र, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेने आग्रही भूमिका घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामांतर होणार, असा दावा शिवसेना (Shiv Sena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर आले असताना ते बोलत होते.

औरंगाबाद हे बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर आहे. दरम्यान, 8 मे 1986 ला आम्ही सगळे निवडून आल्यानंतर आम्ही औरंगाबादमध्ये विजयी मेळावा घेतला होता. तेव्हा बाळासाहेबांनी औरंगाबाद शहराला आपण संभाजीनगर नाव देऊ, असे जाहीर केले होते. साहेबांनी म्हटले तसे आम्ही संभाजीनगरच नामांतर करणार. याला कोणीही कितीही विरोध केला तरी नामांतर होणारच. येत्या महापालिकेच्या निवडणूकीपूर्वी औरंगाबाद शहराचे नामांतर होईल, असा दावा खैरे यांनी केला आहे. हे देखील वाचा- मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, पाहा या क्षणाचे सुंदर फोटोज, See Pics

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद सुरु असल्याचे दिसत आहे. एकीकडे शिवसेनेने नामांतरासाठी ठाम भूमिका घेतली आहे. तर, काँगेसने नामांतरासाठी विरोध केला आहे. यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.