Representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात सोमवारी एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही बाब समोर आल्यानंतर आरोपीने याला आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाल्याने आरोपीला पोलिसांनी अटक केली. दगडू पाचे असे आरोपीचे नाव असून, वर्षा उर्फ सारिका असे मृत मुलीचे नाव आहे. मुलगी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी होती.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपीला दारूचे व्यसन होते. त्याचे घरात पत्नीशी वरचेवर भांडण होत असे. पतीचे वागणे आणि घरगुती अत्याचाराला कंटाळून पत्नी तिच्या आई-वडिलांच्या गेली होती. आरोपी तिला परत घरी येण्याची विनवणी करत होता, परंतु ती परत आली नाही. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मुलगी कपडे सुकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी हुकला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. मुलीच्या गळ्यात दोरी होती. त्यावेळी आरोपीने मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले. परंतु मुलीने आत्महत्या केली नसल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपी पाचेला अटक करण्यात आली. आरोपी गोलतगाव येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचे हा अर्धवेळ चालक म्हणून काम करायचा. (हेही वाचा: Mumbai Cyber Crime Case: मुंबईतील डॉक्टरला 2.99 लाखांचा ऑनलाईन गंडा, आरोपीचा शोध सुरू)

दरम्यान, औरंगाबाद शहरातील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगरजवळ बुधवारी पहाटे सराईत गुन्हेगार अबू बकर चौस हबीब सालेह याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. अबू बकरची चाकूने हत्या केल्यानंतर मारेकऱ्याने त्याचे डोळे काढून त्याच्याशी गोट्या खेळल्या. मृत अबू बकरची हत्या करताना मारेकऱ्याने त्याच्या गळ्यावर 100 हून अधिक चाकूने वार केले होते.