औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाने (Premi Yugul) विष प्राशन करुन एकमेकांच्या मिठी रस्त्यावरच प्राण सोडले आहेत. ही घटना शुक्रवारी (12 फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर घडली. प्रमी युगुल हे नात्याने एकमेकांचे दीर, भावजय लागतात. दीराचे नाव काकासाहेब बबन कदम (वय-32) तर भावजयचे नाव सत्यभामा अशोक कदम (वय 27) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, करमाड कृषी उत्पन्न बाजार समीती रस्त्यावरुन दोघेही निघाले होते. दोघेही चालताना झोकांड्या खात होते. तोल जाऊ लागताच दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघे खाली कोसळले. त्यानंतर ते रस्त्यावरच पडून हातपाय खोडत होते.
हातपाय खोडत असलेले हे दोघे स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांना दवाखान्यात हालविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. दरम्यान, त्यांचे मोबाईलही बाजूलाच पडले होते. दोघांच्याही तोंडातून फेस येत होता. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने पोलिसांशी सपर्क साधला. पोलीसही तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी दोघांनाही 108 रुग्णवाहिकेतून चिकलठाणा येथे उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. (हेही वाचा, पुणे: मैत्रिणीला भेटायला गेला, बायको-मुलांनी घरी नेऊन बदडला; नवऱ्याची पोलिसात फिर्याद, पिंपरी चिंचवड येथील घटना)
सत्यभामा आणि त्यांचे दीर काकासाहेब यांच्यात प्रेमसंबंध असावेत. त्यातूनच दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली असावी अशा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. धक्कादायक माहिती अशी की, सत्यभामा या आपल्या बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गोलटगाव येथे गेल्या होत्या. तेव्हापासून सत्यभामा आणि त्याची बहीण अशा दोघीही बेपत्ता असल्याची तक्रार करमाड पोलिसांना मिळाली होती. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी सत्यभामा यांच्या बहिणीला शोधून काढले. पोलीस सत्यभामा यांच्याही शोधात होते. तोवर दीरासबोत त्यांनी विषप्राशन केल्याचे वृत्त समोर आले.