औरंगाबाद मध्ये कोरोनाचा कहर! रुग्णांचा आकडा 24 हजारांच्या पार
Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता सुद्धा वाढते आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह आता औरंगाबाद येथे कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याच दरम्यान औरंगाबाद मधील कोरोनासंक्रमितांची आकडेवारी समोर आली असून रुग्णांची संख्या 24 हजारांच्या पार गेली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 716 जणांचा कोरोना व्हायरसमुळे बळी सुद्धा गेला आहे.

औरंगाबाद मध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढताना दिसून येत आहे. येथील स्थानिक प्रशासन सुद्धा चिंतेत असून कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश सुद्धा जाहीर केले होते. तर जिल्ह्यात सध्या 4 हजार 523 जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत 16 हजार 775 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.(पुणे: पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोविडमुळे मृत्यू, बेजबाबदार आरोग्य, प्रशासकीय अधिकार्‍यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा; वेब मीडिया असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष अनिल महाजन यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मागणी)

दरम्यान, महाराष्ट्रात काल  आणखी 17 हजार 433 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 292 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी 25 हजार 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5 लाख 98 हजार 496 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.