मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी मध्ये आंदोलनाला बसलेल्या गावकर्यांवर लाठीमार झाल्याची घटना समोर आल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यात दिसायला लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज (4सप्टेंबर) औरंगाबाद (Aurangabad )जिल्हा बंद पाळला जाणार आहे. औरंगाबाद शहरी आणि ग्रामीण भागात हा बंद पाळला जाणार आहे. जालन्यातील घटनेनंतर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक झाली. त्यामध्ये औरंगाबाद बंद चा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद मधील बंदला आज एमआयएमचा पाठिंबा आहे. जालनाच्या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरामध्ये विविध ठिकाणी निदर्शनं देखील केली जाणार आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांवर झालेल्या अमानुष लाठीमार आणि गोळीबाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आजचा औरंगाबाद बंद आहे. नक्की वाचा: Maratha Reservation: आंदोलकांवर लाठीमार प्रकरणी संभाजीराजे,उदयनराजे आक्रमक; सरकारला इशारा .
सध्या जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सीएम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था (एडीजीपी) संजय सक्सेना लाठीचार्जच्या घटनेची चौकशी करतील आणि गरज पडल्यास संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील जालना दौर्यावर आहेत. जखमींची ते विचारपूस करणार आहेत.
जालना मध्ये शुक्रवारी रात्री पासून हिंसक घटनांना सुरूवात झाली. यामध्ये जाळपोळ, दगडफेकीसारख्या घटना समोर आल्या. शुक्र्वारी रात्रीपासून सुरू झालेल्या या हिंसक घडामोडींचा शनिवार सकाळपर्यंत प्रभाव दिसत होता. पोलिसांसोबतच यामध्ये 50पेक्षा जास्त आंदोलक, पोलिस कर्मचारी जखमी आहेत.