ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवलीतील (Dombivli) मानपाडा (Manpada) परिसरातून धक्कादायक घटना पुढे येत आहे. आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या गोंडस योजना (Attractive Investment Schemes) पुढे करत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस येत आहे. प्राप्त तक्रारीवरुन डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी एका कंपनीच्या दोन संचालकांसह अर्धा डझन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 50 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देऊन ४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ती फर्म दावा करत असे की, ती आंतरराष्ट्रीय बाजारात कमोडिटीजमध्ये व्यवहार करते आणि दर आठवड्याला 5 टक्के ते 15 टक्के परतावा सुनिश्चित करू शकते. कंपनीच्या दाव्याला आणि आमिशांना बळी पडून फसवणूक झालेल्यांची संख्या 300 च्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंकज नागराळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची नितेश मर्ढेकर नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. मर्ढेकर यांनी नागराळे यांना सांगितले की, Elation Fiscal Pixie Pvt Ltd नावाची कंपनी दर आठवड्याला गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देते. मर्ढेकर यांनी स्पष्टपणे सांगितले की 2018 मध्ये नोंदणीकृत कंपनी आपल्या कमोडिटी व्यवसायाद्वारे दर आठवड्याला 30 टक्क्यांपर्यंत परतावा सुनिश्चित करू शकते. या आकडेवारीच्या आमिषाने नागराळे यांनी कंपनीचे संचालक शिबू नायर यांची भेट घेतली. (हेही वाचा, Mont Blanc कंपनीच्या नावे होत आहे ऑनलाईन आर्थिक फसवणुक; महाराष्ट्र सायबरने प्रसिद्ध केली फेक वेबसाईट्सची यादी (See List))
पंकज नागराळे हे अंबरनाथ येथे राहतात. नागराळे म्हणाले, “शिबूने मला सांगितले की, एखाद्या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 30 दिवसांनी मला 5% परतावा मिळेल. तो म्हणाला की उदाहरणार्थ, तुम्ही 1.48 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर, पुढील सहा आठवड्यांसाठी 7,410 रुपये कमवू शकता. त्याच्या सांगण्यावरुन 1.48 लाख रुपयांचा प्लॅन घेतला आणि मला 44,460 रुपये मिळाले. एकदा मिळालेल्या परताव्यामुळे माझा लोभ वाढला. त्यानंतर मी 2.72 लाख रुपयांच्या योजनेची निवड केली. मी आपल्या बहिणीलाही याच योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. दोघांनी एकूण 5.42 लाख रुपये Elation Fiscal Pixie Pvt Ltd च्या खात्यात हस्तांतरित केले. परंतु 30 दिवसांनंतरही कोणताही परतावा न मिळाल्याने नागराळे यांनी शिबूशी संपर्क साधला, जो टाळाटाळ करत उत्तरे देत राहिला. नागराळे यांनी सांगितले की, 1 ऑक्टोबर रोजी त्यांना शिबूचा मेसेज आला की तो आत्महत्या करणार आहे. त्यामुळे आम्हाला धक्का बसला आणि आम्ही पोलिसांशी संपर्क साधला.