Pune: खळबळजनक! पुण्यातील रस्त्यावर एका तरूणीचे कपडे फाडून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या तरूणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पुण्यात (Pune) काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असताना पुण्यातून सर्वांना चिंतेत टाकणारा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मुंढव्यातील (Mundhwa) केशवनगर (Keshav Nagar) परिसरात भररस्त्यात तरूणीचे कपडे फाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी (वय, 27) एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. पीडिता गुरुवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास रात्रपाळी संपवून तिच्या घरी जात होती. दरम्यान, ती एकटीत घरी जात असल्याचे पाहून एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. संबंधित व्यक्ती पाठलाग करत असल्याचे पाहिल्यानंतर तरूणी घाबरली. त्यानंतर तिने दुचाकी पळवायला सुरुवात केली. दरम्यान, पीडित तरुणीची दुचाकी घराजवळील एका सोसायटीत असलेल्या स्पीड ब्रेकरवरून आदळल्यामुळे खाली पडली. त्यानंतर पाठलाग करणारा व्यक्ती तिच्याजवळ आला आणि तिची कपडे फाडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पीडिताने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पीडिताचा आवाज ऐकल्यानंतर सोसायटीचा सुरक्षा रक्षक तिच्या मदतीसाठी धावून आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा हैदोस सुरुच! मागील 24 तासांत आढळले 63,282 नवे कोरोनाचे रुग्ण

या घटनेनंतर संबंधित तरूणीने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, याप्रकरणी पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही पुरवा लागला नाही. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यासंदर्भात दैनिक पुढारीने वृत्त दिले आहे.