भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अशी ओळख असलेल्या अटल सेतू मार्ग उद्घाटनानंतर अवघ्या सहा महिन्यांत चर्चेत (Atal Setu Controversy) आला आहे. ही चर्चा त्याच्या वापरामुळे नव्हे तर त्याच्या बांधकाम गुणवत्तेममुळे (Atal Setu Construction Quality) सुरु झाली आहे. या सेतूला मोठ्या भेगा पडल्याचे नुकतेच पुढे आले. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्यक्ष या सेतूवर जाऊन पाहणी केली असता केल्या जाणाऱ्या दाव्यात तथ्य असल्याचे पुढे आले. दरम्यन, हा सेतू आणि त्याच्या गुणवत्तेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच अटल सेतूच्या बांधकाम आणि देखभालीसाठी जबाबदार असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.
अटल सेतू उभारणीसाठी तब्बल 17,843 कोटी रुपये खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी 12 जानेवारी रोजी 21.8 किमी लांबीच्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. तब्बल 17,843 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या पुलाचे मुंबई महानगर प्रदेश (MMR) साठी एक परिवर्तनकारी प्रकल्प आणि एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी उपलब्धी म्हणून गौरव करण्यात आले आहे.
अटल सेतू बांधकाम गुणवत्तेवरुन राजकारण
अटल सेतू उभारणीसाठी आलेला खर्च आणि त्याची गुणवत्ता यावरुन काँग्रेसने विद्यमान राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घटनास्थळाची (अटल सेतू) पाहणी शुक्रवारी केली आणि राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना म्हटले की, या पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले असून त्यांच्या नावावर सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे हे दुर्दैवी आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) भ्रष्ट राजकीय नेत्यांना अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचा धाक दाखवून त्यांच्यात आपल्या पक्षात सामील होण्यास भाग पाडते. देशाच्या विकासाकडे त्यांचे लक्ष नाही. अटल सेतूबद्दल बोलायचे तर त्याचे काम गुणवत्तापूरण झाले नाहीच. शिवाय तो सहा महिन्यांतच खचला असल्याचा दावाही पटोले यांनी केला.
व्हिडिओ
#WATCH | Mumbai, Maharashtra: Repair work underway at Ramp 3 (Service approach road) on Atal Setu bridge
Yesterday, Maharashtra Congress President Nana Patole claimed that there are cracks on Atal Setu and inspected the bridge pic.twitter.com/4JtU9ASifk
— ANI (@ANI) June 22, 2024
'दुरुस्ती सुरु आहे'
अटल सेतूच्या बांधकाम आणि देखभालीसाठी जबाबदार असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एक निवेदन जारी करून स्पष्ट केले की, भेगा कोणत्याही संरचनात्मक दोष दर्शवत नाहीत. "ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने २० जून रोजी केलेल्या तपासणीदरम्यान, मुंबईच्या दिशेने रॅम्पवर तीन ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावर किरकोळ भेगा आढळल्या. या क्रॅक किरकोळ आहेत आणि रस्त्याच्या काठावर आहेत," असे एमएमआरडीएने म्हटले आहे.
एमएमआरडीएने आश्वासन दिले की डांबरी फुटपाथमधील किरकोळ क्रॅक सेतूच्या गुणवत्ता किंवा आयुर्मानावर परिणाम न करता प्रभावीपणे दुरुस्त केले जाऊ शकतात. हा प्रकल्प अद्याप डिफेक्ट लायबिलिटी कालावधीत असल्याने या कामासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदाराला 24 तासांत दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू झाले.