महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 15-20 ऑक्टोंबर दरम्यान होण्याची शक्यता- चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील (Photo credit : Mumbai Live)

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhan Sabha Election) राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर शिवसेना (Shiv Sena) -भाजप (BJP) युतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मधील नेत्यांचे इनकमिंग अद्याप सुरुच आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभा निवडणूकीबाबत मोठे विधान केले आहे.

येत्या 15-20 ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपच्या कोअर कमिटीची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भुपेंद्र यादव यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना, राज्यात आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते. तसेच निवडणूक 15-20 ऑक्टोंबर दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.(आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता 13 सप्टेंबर पासून लागू होणार- रावसाहेब दानवे)

मात्र अद्याप शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालनात एका कार्यक्रमादरम्यान 13 सप्टेंबर पासून आचारसंहिता लागू होईल असे म्हटले होते. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या तारखेला विधानसभा निवडणूक पार पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.