मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण; Asymtomatic असल्याने सध्या घरीच आयसोलेशन मध्ये राहणार
Aslam Sheikh (Photo Credit: Twitter)

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान ते असिम्टमेटिक असल्याने घरीच विलगीकरणामध्ये राहणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. अस्लम शेख यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. अस्लम शेख हे महाविकास आघाडी सरकार मधील चौथे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकार मध्ये सर्वात प्रथम जितेंद्र आव्हाड, त्यापाठोपाठ अशोक चव्हाण, धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. या सार्‍यांनी कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख कोरोनाच्या विळख्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसल्याने ते आयसोलेट राहणार आहेत आणि घरातूनच आपलं काम करणार आहेत. मुंबईत पुढील दोन आठवड्यात कोरोना आटोक्यात येईल; आयआयटी मुंबई प्राध्यापकांचा अहवाल

अस्लम शेख ट्वीट

अस्लम शेख हे कॉंग्रेसचे आमदार असून मालाड पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात. सध्या कोरोना संकटकाळात ते सातत्याने विविध कोविड सेंटरच्या कामांचा आढावा घेण्यासाठी फिल्डवर काम करत होते.

मुंबईत काल आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आणखी 1 हजार 46 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 64 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची मुंबईतील संख्या 1 लाख 01 हजार 224 वर पोहचली आहे. यापैंकी 5 हजार 711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.