Ashok Chavan (Photo Credit: ANI)

मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस जोरदार आक्रमक झाली आहे. भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावे असे अवाहन करतानाच ममता बॅनर्जी यांनी यूपीए कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेस (Congress) नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विविध नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा एक व्हिडिओ शेअर करत ममता बॅनर्जी यांच्या विधानवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत विलासराव देशमुख बोलताना दिसते की, 'काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंटा आणि घोड्यासारखी नाही.'

विलासराव देशमुख यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना अशोक चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, '"काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही." अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली.' (हेही वाचा, Mamata Banerjee Meet Sharad Pawar: ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांचे सूचक विधान)

विलासराव देशमुख यांचे तडाखेबंद भाषण

अशोक चव्हाण यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत विलासराव देशमुख तडाखेबंद भाषण करताना दिसतात. या व्हिडिओत विलासराव म्हणतात, 'काँग्रेसची ही धडक जी आहे ना… ती थेट आहे… सरळ आहे… हत्ती कसा सरळ चालतो… आपली चाल काही… हत्ती सारखी आहे सरळ… या मार्गावर जे येतील त्यांना बरोबर घेऊन… जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून… ही काँग्रेसची चाल आहे. आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही. अन् घोड्यासारखं अडीच घर चालत नाही. सरळ.जो विचार आहे, गरिबांचा विचार आहे, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की, एवढं मोठं पाठबळ तुमच्यासोबत असताना… एवढी मोठी वैचारिक शिदोरी तुमच्याबरोबर असताना… कुणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही. उजळ माथ्याने त्यांच्यासमोर जा. सांगा त्यांना हे आम्ही केलंय आणि राहिलेलं आम्हीच करणार दुसरा कोणीही करू शकणार नाही'