Mamata Banerjee Meet Sharad Pawar: ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांचे सूचक विधान
Sharad Pawar,Mamata Banerjee | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज (1 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओक (Silver Oak) या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनीक प्रसारमाध्यामांशी संवाद साधत माहिती दिली. या वेळी शरद पवार यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे परस्परांशी फार जुने नाते आहे. हे नाते अधिक दृढ करण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत (Mamata Banerjee in Mumbai) आल्या आहे. त्यांनी आज माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची भेट घेतली. आज देशात जी एकूण स्थिती आहे त्याचा विचार करता सर्वांनी मिळून एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचेही शरद पवार म्हणाले. देशात आज स्वतंत्र आणि मजबूत पर्याय उभा करण्याची आवश्यकता असल्याचे सूचक विधानही शरद पवार यांनी केले.

देशात मजबूत पर्याय देताना त्यात काँग्रेस असेल का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला असता शरद पवार यांनी सांगितले की, मी सध्या काँग्रेस किंवा निश्चित कोणत्या एका पक्षाबाबत बोलत नाही. मी फक्त इतकेच म्हणतो आहे की, सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ममता बॅनर्जी यांची काल भेट घेतली होती. हॉटेल ट्रायडंट येथे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचे स्वागत केले. ममता बॅनर्जी आणि शिवसेना यांचे वेगळे नाते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचेही एक वेगळे नाते आहे. त्या मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छित होत्या. परंतू भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यीची भेट घेणे आणि स्वागत करणे स्वाभाविक आहे. मला स्वतःहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी पाठवलं. मी शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यांनी एक शुभ संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलेला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Mamata Banerjee in Mumbai: 'भाजपच्या 'सरकारी' दहशतवादाला पुरुन उरलो, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही हेच घडेल'; ममता भेटीची संजय राऊत यांच्याकडून माहिती)

दरम्यान, शिवसेना खासदादर संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर बरे होऊन राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हावे अशी इच्छा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी या बंगालची वाघीण आहेत. सध्या त्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मुंबईत शासकीय कामासाठी दौरा असला तरीही त्या ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांची या वेळी उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही. मात्र, आदित्य ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. आदित्य ठाकरेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटवस्तू देण्यात आल्या. राजकीय चर्चा पार पडली, असेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.