Mamata Banerjee in Mumbai: 'भाजपच्या 'सरकारी' दहशतवादाला पुरुन उरलो, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही हेच घडेल'; ममता भेटीची संजय राऊत यांच्याकडून माहिती
Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

पश्चिम बंगालच्या West Bengal) मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मुंबई सिद्धिविनायक दर्शन घेतले. तसेच, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचीही भेट घेतली. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच भेटू इच्छित होत्या. मात्र, उद्धव यांच्या प्रकृतीच्या कारणास्त त्यांची ही भेट होऊ शकली नाही. त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितला. राऊत म्हणाले, 'ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या 'सरकारी' दहशतवादास पुरुन उरलो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रही या दहशतवादाचा 'सामना' करेन.'

आगामी काळात गरज पडल्यास तृणमूल काँग्रेस राजकीयदृष्ट्या शिवसेनेला सहकार्य करेल असे संकेत ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्याच्या सुरुवातीलाच दिले. मुंबई दौऱ्याची सुरुवात करतानाच ममत बॅनर्जी यांनी काल (30 नोव्हेंबर) ‘जय मराठा, जय बांगला’ असा नारा दिला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकर आराम मिळावा. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी सिद्धिविनायक चरणी आपण प्रार्थना केल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी हॉटेल ट्रायडंट येथे ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. (हेही वाचा, Mamata Banerjee in Maharashtra: 'जय मराठा, जय बांग्ला' ममता बॅनर्जी यांची मुंबईत घोषणा; भेटीनंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया)

शिवसेना खासदादर संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर बरे होऊन राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हावे अशी इच्छा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी या बंगालची वाघीण आहेत. सध्या त्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मुंबईत शासकीय कामासाठी दौरा असला तरीही त्या ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांची या वेळी उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही. मात्र, आदित्य ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. आदित्य ठाकरेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटवस्तू देण्यात आल्या. राजकीय चर्चा पार पडली, असेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.

महाराष्ट्रात भाजप ज्या प्रमाणे ईडी, सीबीय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून दहशतवाद निर्माण करत आहेत, तशाच प्रकारचे काम पश्चिम बंगालमध्येही सुरु आहे. पण या सरकारी दहशतवादाला आम्ही पुरुन उरलो आहोत. महाहाष्ट्रातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असे घडेल, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्याचेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.