Ashok Chavan Quit Congress Likely to Join BJP: अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा पंजा; भाजपच्या कमळाला हात देण्याची शक्यता
Ashok Chavan | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan Quit Congress) यांनी अखेर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सदस्यत्व आणि आपल्या विधानसभा प्रतिनिधीत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर काँग्रेस (Congress) पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस विचार आणि गांधी कुटुंबावर प्रेम करणाऱ्या आणि निष्ठा असलेल्या महाराष्ट्रातील काही मोजक्या घराण्यांपैकी एक म्हणून चव्हाण यांच्याकडे पाहिले जात होते. काँग्रेसचा पंजा सोडल्यानंतर अल्पावधीतच ते अधिकृतरित्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश (Ashok Chavan Likely to Join BJP) करतील अशी माहिती आहे. दरम्यान, पंजा सोडलेले चव्हाण भाजपच्या कमळाला अधिकृतरित्या हात केव्हा देणार याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकली नाही.

काँग्रेसला धक्का

काँग्रेस सदस्यत्व आणि विधानसभा प्रतिनिधित्व असा दोन्ही ठिकाणचा राजीनामा दिला असल्याचे, अशोक चव्हाण यांनी स्वत:च एक्स हँडलवरुन माहिती दिली. तत्पूर्वीच, त्यांच्या राजीनाम्याबाबत वेगवेगळ्या चर्चा प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळातून रंगल्या होत्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पत्रातही त्यांच्या नावासमोर माजी आमदार असा उल्लेख दिसत होता. राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. लवकरच राज्यसभेच्या महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या काही जागांसाठी मतदान पार पडणार आहे. अशा वेळी राज्यसभेसाठी उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला या राजीनाम्याने मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

अशोक चव्हाण यांच्याकडून राजनाम्याची घोषणा

एक्स हँडलवरुन दिलेल्या माहितीमध्ये अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, 'आज सोमवार, दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी मी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे'.सोशल मीडियात व्हारल झालेल्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात 'महोदय, मी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे', उसा उल्लेख आहे. (हेही वाचा, Nana Patole In Delhi: नाना पटोले दिल्ली दरबारी; मुंबईपाठोपाठ, महाराष्ट्रातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?)

'आगे आगे देखोहोता है क्या'

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल भाजप नेते मात्र मर्यादित प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले 'काँग्रेस पक्षातील जनाधार असलेले अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करु इच्छितात. ते आमच्या संपर्कात आहेत. अनेक नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होते आहे. त्यातील काही आमच्याकडे येत आहेत. काहींना येता येत नाही. त्यामुळे सध्यातरी मी इतकेच म्हणने की, आगे आगे देखोहोता है क्या'. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताचे स्वप्न पाहिले आहे. त्या स्वप्नपूर्तीसाठी जे कोणी भारतीय जनता पक्षाचा विचार आणि दुपट्टा स्वीकारालयला तयार असतील त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो.

अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील नांदेड येथून येतात. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे कट्टर काँग्रेसी विचारांचे होते. त्यांनी केंद्रात आणि राज्यात अनेक पदे भूषवली. त्यांच्याच मार्गावरुन अशोकरावांचाही राजकीय प्रवास सुरु होता. मात्र, वर्तमानकाळात त्यात बदल करुन अशोकराव वेगळा मार्ग पत्करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या निर्णयाने काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत.