Vitthal Rukmini Photo (PC - Twitter/@PandharpurVR)

Ashadhi Ekadashi 2024: यावर्षी येत्या 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) साजरी होणार आहे. हिंदू पंचागानुसार आषाढी एकादशीचा तिथी 16 जुलै रोजी रात्री 08:33 वाजता सुरू होणार आहे आणि ते 17 जुलै रोजी रात्री 09:02 वाजता समाप्त होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणारी गर्दी पाहता प्रशासनाने मोठी तयारे सुरु केली आहे. राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित केलेले होते.

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पेक्षा वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भावी येतात व दर्शन रांगेत 18 तास उभे राहतात अशा भाविकांना दर्शनाला प्राधान्य मिळाले पाहिजे. या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबत शासन प्रशासनाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. प्रशासनाने चेंजिंग रूमची संख्या वाढवावी, तसेच चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूला कचराकुंड्याची संख्या वाढवावी, आवश्यक मनुष्यबळ वाढवावे व संपूर्ण चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. पंढरपूर शहरातील एकाही पोलवर कोणाचेही कट आउट लावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी व रस्ते मोकळे ठेवावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

पंढरपूर येथे येणाऱ्या 15 लाख वारकरी व भाविकांना मोफत पाण्याच्या बॉटल व मँगो ज्यूस देण्यात येणार आहे. हे वाटप करत असताना स्टॉलची संख्या वाढवावी व या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. सर्व भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल व सर्व ठिकाणी स्वच्छता राहील याबाबत अधिक जागरुक राहावे. शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचे मुख्यालय पंढरपूर येथेच राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊन, पंढरपूर शहराचा सर्वंकश विकास आराखडा त्वरित सादर करावा. तसेच राज्य शासनाने वारकरी यांच्या प्रत्येक दिंडी 20 हजार रुपये जाहीर केलेले होते ते संबंधित दिंडी च्या बँक खात्यावर वितरीत झाल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Nashik Anjaneri Fort: अंजनेरी गडावर अडकलेल्या 200 जणांची सहा तास रेस्क्यू ऑपरेशननंतर सुटका)

आषाढी एकादशी साठी पोलीस विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. पंढरपूर शहरात आलेल्या वारकरी व भाविकांना आपल्या वाहनाच्या ताफ्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.