कुटुंब नियोजन (Family Planning) मोहिमेचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकारकडून आशा वर्कर्सना (Asha Workers) दिलेल्या किटचा मुद्दा मध्यंतरी जोरदार चर्चेत होता. या किटमध्ये रबरी लिंग (Rubber Penis) होते. या लिंगासह किटमधील उपकरण आणि साधन सामग्रीच्या माध्यमातून आशा वर्कर्सना समाजात जनजागृती करायची होती. दरम्यान, कुटुंब नियोजन मोहिमेची माहिती देण्यासाठी आशा सेविकांनी रबरी लिंग असलेले किट वापरण्यास नकार दिला आहे. हे किट आशा वर्कर्सनी वापरू नये यावर आशा वर्कर्स संघटनाही ठाम आहेत.
ग्रामिण भागात कुटुंब नियोजनाची माहिती आणि प्रसार करण्याची जबाबदारी आशा वर्कर्सवर देण्यात आली आहे. अपेक्षीत असे आहे की, आशा वर्कर्सनी ग्रामीण भागात तळागाळात जाऊन नवविवाहीत जोडप्यांना कुटुंब नियोजनाची माहिती द्यावी. त्यासाठी आतापर्यंत आशा सेविकांना पुरवेलेल्या माहितीमध्ये विविध तक्ते आणि चित्रांचा समावेश होता. आता मात्र, त्यात किटचा समावेश झाला असून त्यात रबरी लिंगही समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच इतरही काही साहित्य आहे. या सर्व साहित्याचा वापर करुन प्रात्यक्षीक करुन दाखवायचे आहे. हे प्रात्यक्षीक करुन दाखविणे आशा वर्कर्सना लाजिरवाणे वाटत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या समुपदेशनास आशा वर्कर्स आणि त्यांच्या संघटनांनी विरोध दर्शवला आहे. (हेही वाचा, Family Planning: राज्य सरकारच्या कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग; आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजी)
आशा वर्कर्सनी नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, समुपदेशन करण्यासाठी सरकारने दिलेले नवे संच वापरणे फआरसे सोपे आणि सोयीस्कर वाटत नाही. या संचामुळे आमच्या कुटुंबामध्ये वाद होऊ लागले आहेत, असा दावा आशा वर्कर्सानी केला आहे. सरकारने कितीही सक्ती केली तरी आम्ही हे संच वापरणार नाही असे काही आशा वर्कर्स यांनी म्हटले आहे.