राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर 16 सप्टेंबर रोजी होणार्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पत्रकार परिषदेला पोलिसांनी उपस्थित राहण्याची परवानगी दिल्यास मी पत्रकार म्हणून उपस्थित राहू, असे शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी सांगितले. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त शनिवारी औरंगाबाद येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.
17 सप्टेंबर 1948 रोजी सुरक्षा दलांनी हैदराबादवर आक्रमण करून निजाम आणि त्याच्या रझाकार तुकड्यांचा पराभव केला होता. या दिवशी मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि तो भारताचा भाग बनला. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी औरंगाबादेत होणार आहे. पोलिसांनी परवानगी दिली आणि मला रोखले नाही, तर मी मंत्रिमंडळ बैठकनंतर एक पत्रकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहीन. सेनेचे मुखपत्र 'सामना' चे कार्यकारी संपादक असलेले राज्यसभा सदस्य राऊत म्हणाले, ‘यावेळी मला फक्त मुख्यमंत्री शिंदे किती खोटे बोलतात हे पहायचे आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान त्यांच्या औरंगाबाद दौऱ्याचा उद्देश काय, असे विचारले असता राऊत म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याचे आम्हाला समजले. ते आम्हाला दिल्लीत भेटत नाहीत. आम्ही शिवसैनिक आहोत. ही आमची स्वतःची जमीन असल्याने त्यांना इथे भेटायचे ठरवले. पण त्यांचा दौरा रद्द झाला आहे.’ (हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्ग दुरावस्थेवरून मनसे पुन्हा आक्रमक; मंत्री रविंद्र चव्हाणांच्या मुंबईतील कार्यक्रमाबाहेर काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात)
औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीच्या खर्चावरून राज्य सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘त्यांना भव्यतेची सवय आहे. त्यांनी औरंगाबादेत हॉटेल्स बुक केली आहेत. महागडी हॉटेल्स बुक करणे आणि गाड्या भाड्याने घेणे म्हणजे सार्वजनिक पैशांचा अपव्यय आहे.’ राज्य सरकारने मराठवाड्यासाठी यापूर्वी केलेल्या घोषणांची पूर्तता केली नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
ते म्हणाले, ‘मराठवाड्याच्या विकासासाठी 2016 मध्ये ₹49,000 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत किती आश्वासनांची पूर्तता झाली? आता सरकार आणखी 40,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी दिलेली किती आश्वासने पूर्ण केली आहेत हे सरकारने सांगावे.’