Vijay Shinde, Khatav | (File Image)

लद्दाख (Ladakh) येथे लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव (Khatav) तालुक्यातील सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले आहे. भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडून हा अपघात झाला. या वाहनात 26 सैनिक होते. ज्यात सुभेदार विजय यांचाही समावेश होता. या अपघातात विजय शिंदे यांच्यासह इतरही सहा जवानांना वीरमरण आले आहे. सुभेदार विजय शिंदे यांना विरमरण आल्याचे कळतात त्यांच्या खाटाव तालुक्यातील विसापूर या मूळ गावी शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. सुभेदार विजय यांचे पार्थिव रविवारी (29 मे) विसापूर (ता. खटाव) येथे आणले जाईल. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.

विसापूर या साध्या गावातील तरुण विजय सर्जेराव शिंदे हा 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फट्री मध्ये लष्करी सेवेत दाखल झाला. त्या वेळी तो केवळ 24 वर्षांचा होता. लष्करात त्याला सुभेदार हा हुद्दा मिळाला. लष्करात काम करत असताना विजय शिंदे यांनी देशाच्या विविध ठिकाणी काम केले. देशाचे संरक्षण केले. ही सेवा करतानाच त्यांना वीरमरण आले. उल्लेखनीय असे की, विजय शिंदे हे ज्या वीसापूर गावातून येत त्या गावाला सैनिकी परंपरा आहे. त्यांच्या कुटुंबालाही लष्करी परंपरा आहे. त्यांचे वडील सर्जेराव शिंदे लष्करी सेवेतच होते. त्यांचे वडील बंधू प्रमोद शिंदे हे देखील लष्करात पॅरा कमांडो होते. सहाजिकच विजय यांनीही ती परंपरा कायम ठेवली. (हेही वाचा, India China Tension: लद्दाख मध्ये PP-14, PP-15,PP-17 मधून चीनी सैन्य मागे हटले; भारतीय लष्कराच्या सूत्रांची माहिती)

विजय शिंदे यांना वीरमरण आले तेव्हा ते लेह लद्दाख येथे कर्तव्यावर होते. परतापूर येथील संक्रमण शिबीरातून उपसेक्टर हनिफच्या फॉर्वर्डकडे लष्करी वाहनातून जाताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. वाहनात 26 जवान होते. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचा अपघात झाला. लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळून झालेल्या अपघातात सात सैनिकांना वीरमरण आले. तर 16 जण जखमी झाले.