Arjun Khotkar | PC: Twitter@@Adhav_Akshay1

शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशी उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे अनेक जुने, जाणते नेते एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सहभागी आहे. त्यामध्ये आता अर्जुन खोतकरांचा देखील सहभाग होणार का? ही चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान मागील काही दिवसांत दोनदा अर्जुन खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. यामध्ये आज सकाळी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खोतकरांचे कट्टर विरोधक रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची एकत्र भेट झाली आहे.

अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना आपण वैयक्तिक कामांसाठी दिल्लीत आलो आहोत. आज मुर्मूंचा शपथविधी झाल्यानंतर सहज एकनाथ शिंदेंसोबत भेट झाली. आपण पक्षातच आहोत. शिवसेनेसोबतच राहणार असे जरी म्हटले असले तरिही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार का? तो विचार बदलणार नाही? या एबीपी माझाच्या प्रतिनिधीच्या प्रश्नावर मात्र उत्तर टाळल्याने शिंदेगटामध्ये सहभागी होत अर्जुन खोतकरही उद्धव ठाकरेंना धक्का देणार का? अशी चर्चा रंगत आहे.

रावसाहेब दानवे यांनी देखील मीडीयाशी बोलताना एकनाथ शिंदेंनी माझी आणि अर्जुन खोतकर यांची भेट घडवून आणली आहे. जुने वाद विसरून मतदारसंघात एकत्र काम करा असं आवाहन केले आणि त्याला आम्ही दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगितल्याने चर्चा अधिकच वाढल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसंवाद यात्रा घेऊन आदित्य ठाकरे अर्जुन खोतकरांकडे पोहचले होते. त्यावेळी सभेत आदित्य ठाकरेंनी अर्जुन खोतकरांवर असलेला दबाव आम्ही समजू शकतो पण अशा स्थितीतही तुम्ही आमच्यासोबत उभे राहिलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन असं म्हणत त्यांची पाठ थोपटली होती. नक्की वाचा: शिवसेना नेते Arjun Khotkar यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; 78.38 कोटींची मालमत्ता जप्त.

एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांच्या मगे ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या नोटीशांचा ससेमिरा लागलेला आहे. त्यामुळे  या दबावातून अनेकांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहे.