APMC Market | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई शहर आणि नवी मुंबई (Navi Mumbai) या शहरांना भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर सेवांचा पुरवठा करणारे एपीएमसी मार्केट (APMC Market) आज ठप्प झाले आहे. पन्नास किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी उचलण्यास नकार देत माथाडी कामगारांनी (Mathadi Kamgar) आज (16 नोव्हेंबर) बंद पुकारला आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटमधील उलाढाल आज ठप्प पडली आहे. तर मार्केटबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आजच्या बंदचा परिणाम शहरातील भाजी आणि फळ बाजरावर होण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास भाजीपाला आणि फळांच्या किमती अचानक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये प्रतीदिन 100 ते 120 इतक्या गाड्यांची आवक होते. या गाड्यांतून कांदा, बटाटा आणि भाजीपाला येत असतो. मात्र, अनेकदा या गाड्यांमध्ये असलेल्या गोणी 50 किलोपेक्षा अधिक असतात. त्या सर्व गोणी कामगारांना वाहून न्याव्या लागतात. राज्य सरकारचा आदेश आहे की, 50 किलोपेक्षा अधिक क्षमतेच्या गोणी भरण्यात येऊ नयेत. क्षमतेपेक्षा अधिक गोणी भरल्यास कामगारांना त्रास होतो. त्यामुळे या गोणी वाहून नेण्यास कामगारांनी नकार दिला आहे. (हेही वाचा, पुण्यातील APMC मार्केट अखेर 50 दिवसानंतर आजपासून सुरु, 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक)

अधिक वजनाच्या गोणी उचलल्यामुळे कामगारांना अनेकदा मान, पाठ आणि कंबरेचे विकार होता. अनेकदा मनक्यांच्या विकारांनाही सामोरे जावे लागते. त्याचा कारणाशिवाय खर्च कामगारांवर लादला जातो. परिणामी आर्थिक आणि शारीरिक अशा दोन्ही संकटांना कामगारांना सामोरे जावे लागते. कामगारांचे आरोग्य विचारात घेता 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी उचलणे धोकादायक आहे. त्यामुळे या गोणी उचलण्यास कामगारांनी नकार दिला आहे. 50 पेक्षा अधिक वजनाच्या गोणी भरणे बंद करावे अन्यथा कांदा बटाटा मार्केटप्रमाणे इतर मार्केटही बंद करु. या विषयावर तीव्र आंदोलन करु, अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतली आहे.