Kirit Somaiya Receives Threat: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुन्हा एकदा व्हिडिओ उघड करण्याची धमकी देणारा आणखी एक ई-मेल प्राप्त झाला आहे. यानंतर सोमय्या यांनी मुंबई पोलिसांशी (Mumbai Police) संपर्क साधला आहे. या प्रकरणात त्यांच्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. किरीट सोमय्या यांनी मुलुंडमधील नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमय्या यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, 24 सप्टेंबर रोजी सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता, ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून 50 लाख रुपयांची मागणी केली.
हा मेल हृषिकेश शुक्ला नावाच्या आयडीवरून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फेक आयडी असू शकतो. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांची अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप प्रसारित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका मराठी वृत्तवाहिनीवर तीन दिवसांची बंदी घातली होती. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. (हेही वाचा - Mumbai Crime News: प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेचा विनयभंग, रेल्वे कर्मचारी असलेला आरोपी अटकेत)
दरम्यान, धमकीच्या दुसऱ्या मेलनंतर सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या वर्षी जुलैमध्ये, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्हायरल व्हिडिओ क्लिपचा तपास सुरू केला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा तपास सुरू केला होता.
एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले होते की गुन्हे शाखा युनिट 10 व्हिडिओची सत्यता आणि प्रकरणाचा तपास करेल. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेणार आहे. किरीट सोमय्या यांनी जुलैमध्ये व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांना आरोपांची चौकशी करण्याची आणि व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली होती.