93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची कार्यकारिणी जाहीर; स्वागताध्यक्षपदी नितीन तावडे
प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो सौजन्य-फेसबुक)

सालाबादप्रमाणे पुढील वर्षीचे म्हणजे 2020 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (All India Marathi Literary Conference) हे उस्मानाबाद (Osmanabad) येथे पार पडणार आहे. 2020 मधील हे 93 वे संमेलन असणार आहे. आज साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची कार्यकारिणी (Executive Board) जाहीर करण्यात आली. यामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संमेलनाच्या अंतिम तारखा ठरवल्या जाणार आहेत. या संमेलनाचे आयोजन मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा करणार आहे.

संमेलनाच्या कार्यकारिणी मंडळात संमेलनाच्या प्रमुख कार्यवाहपदी रवींद्र केसकर, कोषाध्यक्षपदासाठी माधव इंगळे यांच्या प्रसात्वाला मान्यता देण्यात आली आहे. जेष्ठ लेखिका कमलताई नलावडे यांनीही या प्रस्तावास अनुमोदन दिले. या बैठकीस बैठकीस मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह विविध संस्था, संघटनांचे स्वागत मंडळाचे सभासद असलेले प्रतिनिधी उपस्थित होते. (हेही वाचा: उस्मानाबाद येथे पडणार जानेवारी 2020 मधील 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)

दरम्यान, गेले अनेक वर्षे मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन घ्यावे अशी मागणी करण्यात येत होती. मात्र प्रत्येकवेळी मंडळाने मोठ्या शहरांना प्राधान्य दिले. आता अखेर 2020 च्या साहित्य संमेलनाच्या यजमानापदाचा मान उस्मानाबादला मिळाला आहे. अंतिम ठिकाणासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार शहरांमध्ये स्पर्धा रंगली. शेवटी 20 जणांच्या सहमतीने उस्मानाबादवर शिक्कामोर्तब करण्यात आले.