सालाबादप्रमाणे पुढील वर्षीचे म्हणजे 2020 मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) हे उस्मानाबाद (Osmanabad) येथे पार पडणार आहे. 2020 मधील 93 वे संमेलन असणार आहे. आज (22 जुलै) पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. लवकरच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संमेलनाच्या अंतिम तारखा ठरवल्या जाणार आहेत. या संमेलनाचे आयोजन मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा करणार आहे.
गेले अनेक वर्षे मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन घ्यावे अशी मागणी करण्यात येत होती. मात्र प्रत्येकवेळी मंडळाने मोठ्या शहरांना प्राधान्य दिले. आता अखेर 2020 च्या साहित्य संमेलनाच्या यजमानापदाचा मान उस्मानाबादला मिळाला आहे. अंतिम ठिकाणासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार शहरांमध्ये स्पर्धा रंगली. शेवटी 20 जणांच्या सहमतीने उस्मानाबादवर शिक्कामोर्तब करण्यात आले. (हेही वाचा: तब्बल अठरा वर्षांनी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी महिला लेखिकेची निवड)
याआधी आर्थिक आणि पाण्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबादला यजमानपद देणे टाळले होते. मात्र अगदीच वेळ पडली तर पिठलं-भाकरी खाऊन साहित्य संमेलन पार पाडू असे कौतिकराव ठाले पाटील म्हणाले. आता मुद्दा रंगणार आहे तो संमेलनाध्यक्ष कोण होईल याचा. वाद आणि साहित्य संमेलन यांचे नाते पाचवीलाच पूजले आहे. यावर्षीच्या यवतमाळ येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाला फार मोठे गालबोट लागले. जो वाद निर्माण झाला त्यामुळे अनेक लेखकांनी त्या संमेलनावर बहिष्कार टाकला होता. मात्र उस्मानाबादचे साहित्य संमेलन वादाशिवाय पार पडेल, असा विश्वास ठाले यांनी व्यक्त केला.