मागण्या मान्य न झाल्यास 'पद्मभूषण' पुरस्कार परत करणार - अण्णा हजारे,  उपोषणावर अण्णा ठाम
Anna Hazare (File Photo) Photo Credits: Twitter

Anna Hazare Hunger Strike: राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसलेले अण्णा हजारे (Anna Hazare) सलग पाचव्या दिवशीदेखील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सरकार कडून अण्णांच्या मनधरणीसाठी गेलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि अण्णा हजारे यांच्यामधील बैठक निष्फळ ठरली आहे. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास 8 किंवा 9 तारखेला ' पद्मभूषण' (Padma Bhushan) पुरस्कार परत करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा अण्णांनी सरकारला दिला आहे.  अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस

30 जानेवारीपासून अण्णा हजारे लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीची मागणी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा अशा मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. या मागण्या केवळ मान्य करणं पुरेसे नाही त्यांची अंमलबजावणी होणं गरजेचे आहे. लोकपालाची नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या असे सरकारला बजावले आहे.

अण्णा हजारे यांचे वय 82  वर्ष आहे. मागील पाच दिवस ते उपोषण करत आहेत. उपोषणाच्या काळात त्याचं चार किलो वजन कमी झालं आहे. शरीरात ग्लुकोजची पातळी खालावली आहे. हे अण्णांच्या आरोग्याला घातक ठरू शकतं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर अण्णांच्या आरोग्यासोबत सरकारने खेळू नये असे म्हणत शिवसेनेने अण्णांना पाठींबा दर्शवला आहे.

लोकपाला संदर्भातल्या 1971 च्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी अण्णांनी केली होती. सरकारला ही मागणी मान्य असून नवा कायदा तयार करण्यासाठी ड्राफ्टिंग कमेटी स्थापन करण्याचही सरकारने मान्य केलं आहे. सोमवारी त्याचं पत्र घेऊन पुन्हा राळेगणसिद्धी येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.