Anna Hazare Hunger Strike: अण्णा हजारे यांचे 30 जानेवारीपासून होणारे आमरण उपोषण स्थगित; देवेंद्र फडणवीस आणि कैलाश चौधरी यांची भेट घेतल्यानंतर बदलला निर्णय
अण्णा हजारे (Photo Credits: PTI)

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी 30 जानेवारीपासून होणारे आपले आमरण उपोषण (Hunger Strike) मागे घेतले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि कैलास चौधरी यांची भेट घेतल्यानंतर अण्णांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान अण्णा हजारे हे 30 जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात आमरण उपोषण सुरू करणार होते. अण्णा हजारे यांचे म्हणणे आहे की, 2018 पासून ते केंद्र सरकारला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची विनंती करत आहेत. परंतु सरकारने त्या मागण्या ऐकल्या नाहीत. यामुळे 30 जानेवारीपासून सरकारविरोधात त्यांचे आमरण उपोषण सुरू होणार होते.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर आता अण्णा उपोषणाला बसणार नाहीत असे समजत आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘काही महत्वाच्या मुद्द्यांवर अण्णांचा सातत्याने आग्रह होता. मागच्यावेळी जेव्हा अण्णा उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांना सरकारने काही आश्वासने दिली होती व नंतर त्यातील काहींची पूर्तताही झाली. मात्र अजून काही मुलभूत मुद्दे होते, ज्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. मात्र त्यावेळी ती समिती स्थापित होऊ शकली नाही. त्यानंतर पुन्हा अण्णांनी सरकारला त्या मुद्द्यांची आठवण करून दिली. आता गेले काही दिवस आमची अण्णांशी बैठक चालू होती. अण्णांचे सर्व मुद्दे केंद्र सरकारपुढे मांडले गेले व त्यानंतर आता समिती गठीत केली आहे.

अण्णांच्या मागण्यांवर विचार करून ही समिती पुढील 6 महिन्यांमध्ये निर्णय घेणार आहे. याबाबत कैलाश चौधरी म्हणाले की, ‘अण्णांच्या मागण्यांवर केंद्राने विचार करायचे ठरवेल आहे. याधीची अण्णांच्या अनेक पत्रांना केंद्राने उत्तरे दिली आहे. आता आण्णांच्या मागणीखातर सरकार अण्णांनी सुचवलेल्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल.’ (हेही वाचा: Mumbai Local 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी प्रवासासाठी खुली पण केवळ 'या' वेळेत करता येणार प्रवास)

याबाबत अण्णा हजारे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मी उद्यापासून उपोषण करणार होतो. मात्र आता केंद्राचा निरोप व पत्र घेऊन देवेंद्र फडणवीस व चौधरी आले. मी केंद्राला 15 मुद्दे सुचवले होते व आता केंद्र त्याचा सकारात्मकदृष्ट्या विचार करेल असा विश्वास वाटल्याने मी हे उपोषण मागे घेत आहे.’