Sitaram Kunte | (Photo Credit - Twitter)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीकडून सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांचा जबाब नोंदविण्यात आला. सीताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackera) यांचे मुख्य सल्लागार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर इडीकडून अनिल देशमुख यांच्या मालमत्तांची चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात ईडीकडून सीताराम कुंटे यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान, ईडीने कुंटे यांचा जबाब नोंदवला.

ईडीने सीताराम कुंटे यांना आतापर्यंत 2 वेळा समन्स बजावले आहे. त्यानंतर आज (7 डिसेंबर) सकाळी सीताराम कुंटे हे ईडी कार्यालयात हजर झाले. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या आधी गृह विभागाचे उपसचिव कौलास गायकवाड यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या आधारे सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. तर सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीनेही अनिल देशमुख यांच्यासह इतरही काहीजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Mumbai HC on Nawab Malik: नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस, वानखेडे प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचेही आदेश)

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अनिल देशमुख हे जेव्हा गृहमंत्री पदावर कार्यरत होते तेव्हा अनेक पोलिस अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली होती. काहींची नियुक्त करण्यात आली होती. या वेळी सीताराम कुंटे हे राज्याचे मुख्य सचीव होते. त्यामुळे या प्रकरणात कुंटे यांचीही चौकशी केली जात आहे.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य दिले होते. सचिन वाझे हा मुंबईतील बार आणि हॉटेल्स मालकांकडून वसूली करत असे. याशिवाय रश्मी शुल्का यांनी दिलेल्या गोपनीय अहवालाच्याअधारे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा कथीत आरोप आहे. या सर्व आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या चौकशी सुरु आहे.