
ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे (Mumbai Police EOW) शाखेकडून समन्स बजावण्यात आला आहे. . शिवसेना पक्षाच्या निधी काढण्यावरून शिवसेना शिंदे गटाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आता आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या निधी खात्या संदर्भात चौकशीसाठी अनिल देसाई यांना 5 मार्च दिवशी चौकशीसाठी बोलवलं आहे.
निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनीही खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असा निर्णय दिल्यानंतरही ठाकरे गटाने पक्ष निधी खात्यामधून 50 कोटी रूपये काढल्याची तक्रार शिंदे गटाकडून करण्यात आली होती. यावरून आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाई यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. सध्या निवडणूकीचे वारे आहेत. आगामी लोकसभा निवडणूका आता काही दिवसात जाहीर केल्या जाऊ शकतात. अशा स्थिती मध्ये ठाकरे गटातील अजून एका बड्या नेत्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. नक्की वाचा: Shinde vs Thackeray: ठाकरे गटाकडून पार्टी फंडाचे 50 कोटी काढल्याच्या शिंदे गटाच्या तक्रारी नंतर Economic Offences Wing कडून तपास सुरू - मुंबई पोलिसांची माहिती .
दरम्यान अनिल देसाई यांच्या सचिवाविरूद्ध देखील ईडीने केस दाखल केली आहे. त्याच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत. दिनेश बोभाटे असं त्याचं नाव असून सीबीआय ने भ्रष्टाचाराचे त्याच्यावर आरोप केले आहेत. याच आधारे ईडी ने देखील त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
ठाकरे गटातील किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, राजन साळवी सध्या केंद्रीय यंत्रणांच्या रडार वर आहेत. त्यामध्ये आता अनिल देसाई यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. अनिल देसाई हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. नुकताच त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला आहे. आता ते लोकसभेच्या रिंगणातून दिल्लीला जाणार असल्याची देखील चर्चा आहे.