Anganewadi Jatra 2021: सिंधुदुर्गमधली भराडी देवीची यात्रा आंगणे कुटुंबियांपुरतीचं मर्यादित; आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे मार्ग सील
आंगणेवाडी भराडी देवी यात्रा 2021 (Photo Credits : File Photo)

Anganewadi Jatra 2021: सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी (Anganewadi) येथील भराडी देवीच्या यात्रेला (Bharadi Devi Yatra) दरवर्षी हजार भाविक मोठ्या भक्तीने येत असतात. यंदा भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी होणार आहे. मात्र, यावर्षी भराडी देवीच्या यात्रेवर कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी यात्रेसंदर्भात विशेष सूचना जारी केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, यंदा आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित असणार असून या कुटुंबातील 50-50 व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. आंगणेवाडीला येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग सील करण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भराडीदेवीची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी भाविकांना यात्रेला न येण्याचं आवाहन केलं होतं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' च्या धर्तीवर 'माझी जत्रा माझी जबाबदारी,' असं अभियान जत्रेत राबवणार असल्याचं म्हटंल होत. आता सिंधुदुर्गच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी यात्रेसाठी काही निर्बंध घातले आहेत. (वाचा - Coronavirus Vaccine: महाराष्ट्रात 33 हजार जणांचे लसीकरण पण एका व्यक्तीचा कोविशिल्डचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू)

दरम्यान, भराडी देवी यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली असली तरी यात्रेसंबंधित धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत. यंदा आंगणेवाडीची जत्रा अगदी साध्या पद्धतीने साजरी केला जाणार आहे. यावर्षी ही यात्रा केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, यात्रेच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या आंगणे कुटूंबियांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. आंगणे कुटुंबियांव्यतिरिक्त इतर कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. यात्रेदरम्यान, कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी आंगणे कुटुंबियांना दिल्या आहेत.