Mumbai LGBTQ Pride Parade 2020: मुंबईत एलजीबीटीक्यू परेडमध्ये शरजील इमाम समर्थनार्थ घोषणा; उर्वशी चुडावालासह 50 जणांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

यावर्षीच्या मुंबई एलजीबीटीक्यू परेडला (Mumbai LGBTQ Pride Parade 2020) गालबोट लागले आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी मुंबईच्या आझाद मैदानावर 'मुंबई प्राइड सॉलिडॅरिटी गॅदरिंग 2020' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान तेथे उपस्थित काही लोकांनी शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात काही लोक हातात फलक आणि बॅनर घेऊन घोषणा देताना दिसून आले आहेत.

आता मुंबई पोलिसांनी उर्वशी चुडावाला (Urvashi Chudawala) हिच्यासह इतर 50 जणांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस लवकरच अटक करू शकतात.

मुंबई एलजीबीटी परेड ही आशियामधील एक महत्वाची परेड मानली जाते. दरवर्षी एलजीबीटीक्यू समुदायामधील लोकांसोबत हजोरोंच्या संख्येने स्ट्रेट लोकही यामध्ये सामील होतात. मात्र यंदा पोलिसांनी या परेडसाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे लोक आझाद मैदान येथे एकत्र जमले होते, जिथे त्यांनी शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. उर्वशी चुडावाला या गोष्टीचे प्रतिनिधित्व करत होती. या व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एलजीबीटी समुदायातील अनेक लोकांकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला. आता चुडावालासोबत इतर 50 जणांवरही कलम-124 ए, 153 बी, 505, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा: Mumbai LGBT Pride March 2020: यंदाची मुंबई एलजीबीटीक्यू रॅली रद्द; पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हमसफर ट्रस्टने घेतला निर्णय)

आपले अस्तित्व साजरे करण्यासोबत, समाजाची स्वीकृती मिळावी म्हणून जगभरात अशा परेडचे आयोजन केले जाते. मात्र यंदाची परेड ही एक राजकीय रॅली ठरली. सध्या देशात CAA आणि NRC मुळे वातावरण चिघळले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांत याबाबत निदर्शने केली जात आहेत. याच मुद्द्यावरून पोलिसांनी या परेडसाठी परवानगी नाकारली होती. मात्र प्रत्यक्षात तसेच घडले. या परेडच्या आयोजकांनी मात्र आपण ज्या लोकांनी ही निदर्शने केली त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले आहे.