LGBT Representational Image (Photo Credits: Pixabay)

सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 (Section 377) रद्द करून फार मोठा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर एलजीबीटीक्यू (LGBTQ) समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काही प्रमाणात तरी बदलला. आपले अस्तित्व साजरे करण्यासोबत, समाजाची स्वीकृती मिळावी म्हणून जगभरात LGBTQ समुदायाकडून परेडचे (LGBT Pride March) आयोजन केले जाते. भारतात मुंबईची परेड ही दरवर्षीच लक्षवेधी ठरते. यंदा हमसफर ट्रस्टकडून (Humsafar Trust) 1 फेब्रुवारी रोजी अशा क्विअर आझादी मुंबई, परेडचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी मुंबई पोलिसांनी याची परवानगी नाकारली आहे. द इंडिअन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार हमसफर ट्रस्टकडून यानंतर यंदाची परेड रद्द करण्यात आली आहे.

मुंबईच्या परेडबाबत पोलीस परवानगी आणि सुरक्षेबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र पोलिसांनी यंदाच्या परेडची परवानगी पूर्णतः नाकारली आहे. सध्या देशात CAA आणि NRC मुळे वातावरण चिघळले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांत याबाबत निदर्शने केली जात आहेत. अशात या LGBTQ परेडमध्येही CAA-NRC या मुद्द्याबाबत निदर्शने होणार आहेत, फलक दर्शवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबतचा एक मेसेज सोशल मिडियावर पसरत होता. याच कारणास्तव पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. मात्र लोकांना एकत्रित येण्यास कोणताही मज्जाव केला नाही. (हेही वाचा: Google Doodle #Celebrating Pride: लैंगिक अभिव्यक्तीची 50 वर्षे पूर्ण करत गुगलने डूडलच्या माध्यमातून उलगडला LGBT चा इतिहास)

व्हायरल होत असलेला संदेश -

पोलिसांकडून आझाद मैदानावर एकत्र येण्याचा सल्ला दिला गेला आहे. मात्र या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. अशा सर्वांनी फक्त आझाद मैदानावर एकत्र यायचे ठरवले तर ते खरे निदर्शन असल्यासारखे भासेल, असा विचार करून हमसफरने यंदाची रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.