Thane: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भाईंदर टाऊनशिपमध्ये एका व्यक्तीने आपल्या 40 वर्षीय पत्नीची हत्या केली. विशेष म्हणजे हत्येमागचं कारण ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल. नाश्त्यात मीठ जास्त झाल्याने संतापलेल्या पतीने आपल्या बायकोची हत्या केली. अगदी शुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेनंतर परिसरातील सर्वांनाचं धक्का बसला आहे. भाईंदर पूर्वेकडील फाटक रोड परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे नाव 46 वर्षीय नीलेश घाघ असे आहे. पोलिसांनी सांगितले की, सकाळी 9.30 च्या सुमारास न्याहारी केल्यानंतर आरोपीने पत्नी निर्मला हिचा गळा दाबून खून केला. (हेही वाचा - Thane: धक्कादायक! नाश्ता न दिल्याच्या रागातून सासऱ्याने सुनेवर झाडली गोळी)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने दिलेल्या 'खिचडी'मध्ये जास्त मीठ असल्याने आरोपी नाराज होता. आरोपीने पत्नीचा कपड्याने गळा आवळून खून केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला. भायंदर येथील नवघर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात नाश्त्यावरून सासऱ्याने सुनेवर झाडली गोळी -
गुरूवारी ठाण्यात अशाचं प्रकारची घटना घडली होती. चहासोबत नाश्ता वेळेवर न दिल्याने संतापलेल्या सासऱ्याने सुनेवर गोळी झाडली. राबोडी भागातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय महिलेच्या पोटात गोळी लागल्याने शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.