Amravati Soneri Bhog Mithai (संग्रहित संपादित प्रतिमा)

Amravati Soneri Bhog Mithai: आजच्या वसुबारसपासून दिवाळीच्या (Diwali 2024) उत्सवाला सुरुवात झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. सर्वत्र कपडे, मिठाई, सजावटीच्या वस्तूंची रेलचेल दिसत आहे. यावेळी बाजारात अनेक प्रकारच्या मिठाई पाहायला मिळत आहेत. माव्याची मिठाई, दुधाची मिठाई, ड्रायफ्रुट्स मिठाई आणि बरेच काही. पण तुम्ही कधी सोनेरी मिठाई खाल्ली आहे का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण यावेळी महाराष्ट्रात सोनेरी मिठाई चर्चेत आहे. सोन्यापासून बनवलेली ही ‘सोनेरी भोग’ मिठाई बाजारात दाखल झाली असून, या मिठाईची किंमत अनेकांच्या दिवाळी बजेटपेक्षा जास्त आहे.

अमरावतीतील (Amravati) एका दुकानदाराने ही 'सोनेरी भोग' मिठाई बनवली आहे, जी बदाम, काजू, बेदाणे आणि पिस्तापासून तयार केली आहे. या मिठाईवर 24 कॅरेट सोन्याचे काम करण्यात आले आहे. अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या मिठाईला मागणी दिसून येत आहे. बाजारात 14 हजार रुपये किलो दराने ही मिठाई उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये 3 हजार रुपये वाढ झाली आहे.

अमरावती येथील रघुवीर नावाच्या दुकानातून ही मिठाई विकली जात आहे. मिठाईबाबत दुकानमालक चंद्रकांत पोपट सांगतात की, ‘दिवाळीत विविध प्रकारच्या खास मिठाईबद्दल ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. अमरावतीमध्ये खास मिठाईची परंपरा आहे आणि सोन्याचे काम असलेली ही मिठाई लोकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. दिवाळीला प्रत्येक घरात खास मिठाई बनवली जाते, म्हणूनच आम्ही आमची खास मिठाई बाजारात आणली आहे ज्याला सोनेरी भोग म्हणतात.’ अमरावतीच्या बाजारपेठेत ही मिठाई पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. (हेही वाचा: World Record In Nagpur: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर करणार 24 तासात 10 हजार डोसे बनवण्याचा विश्वविक्रम)

महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्येही\ सोन्याच्या मिठाईने बनवलेल्या हाराची परंपरा आहे. सुरतच्या बाजारात उपलब्ध असलेल्या या गोड हाराची किंमत 21 हजार रुपयांपासून 31 हजार रुपयांपर्यंत आहे. सुरतमधील ग्राहकांमध्ये या हाराची प्रचंड उत्सुकता असून, लोक मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी करत आहेत. दरम्यान, सध्या सोन्याचे दिवसेंदिवस वाढत आहेत. सोने 75 हजारच्या पुढे गेले आहे. असे असूनही बाजारात सोन्याचे काम असलेल्या या मिठाई मोठ्या प्रमाणांत खरेदी केल्या जात आहेत.