
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे (Dhamangaon Railway) येथे शाळेसमोर अल्पवयीन विद्यार्थिनीची (Minor Girl student) छेड काढून तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मजकूर लिहिलेली चिठ्ठी पीडितेच्या अंगावर टाकून धमकी दिली. या मजकूरात पीडितेसह तिच्या वडिलांनाही ठार मारण्याची धमकी दिली आहे. घडल्या प्रकारामुळे पिरसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या धमकीवरुन पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. आरोपींविरोधात पोक्सो आणि विनयभंग अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
धामणगाव रेल्वे येथील एका शाळेतील 17 वर्षीय विद्यार्थीनी व्हॅनची वाट पाहात शाळेसमोर उभी होती. उभ्या असलेल्या या विद्यार्थीनीवर तरुण मुलांचे एक टोळके बारीक लक्ष ठेऊन होते. या टोळक्यातील दोन तरुण दुचाकीवरुन तरुणीजवळआले. त्यांनी तिच्या अंगावर एक चिठ्ठी फेकली आणि ते निघून गेले. तरुणीने चिठ्ठी उचलली आणि ती हबकलीच. चिठ्ठी घेऊन ती तशीच घरी पोहोचली. पीडितेने कुटुंबीयांना चिठ्ठीबद्दल माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पीडितेसह दत्तापूर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पीडिता आरोपींना ओळखत नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरोधात पोक्सो आणि विनयभंग अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Rape: शाळेत शिकणाऱ्या 15 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी 62 वर्षीय दुकानमालकाला अटक)
चिठ्ठीमध्ये काय होतं?
दरम्यान, आरोपींनी पीडितेच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीमध्ये धक्कादायक मजकूर होता. 'तुझा खेळ संपला. तुम्हाला खल्लास करतो. तिला ठेवत नाही. वडिलांना सांगते काय? त्यालाही पाहून घेतो. थांब आता आम्ही त्याच्याकडेच चाललो आहोत. त्याला पाहायला. तू विचारच कर. तू मरतेस आता. तू माझा खेळ खतम केलास', अशी काही वाक्ये चिठ्ठीमध्ये आढळून आली आहेत.