कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार
Amit Deshmukh | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घेण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशिप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, यास केंद्रीय परिषदेने नकार दिल्याने येत्या 31 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी व्यक्त केला आहे.

यासंदर्भात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम संपताचं कालापव्यय टाळण्यासाठी इंटर्नशिप सुरू करून परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, केंद्रीय परिषदेने यास नकार दिल्याने या प्रश्नावर येत्या 31 तारखेला होणाऱ्या अंतिम सुनावणीत भूमिका मांडताना राज्य सरकार आपली बाजू लावून धरणार असल्याचंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 9,211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 298 जणांचा मृत्यू)

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मनस्थिती आपण समजू शकतो. यामुळे 31 तारखेच्या अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असंही अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.