Maharashtra Shocker: एका व्यक्तीने आधी आपल्या मित्राची हत्या केली आणि हत्येचा कट लपण्यातचं त्याचाही मृत्यू झाला. किरकोळ वादातून एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली होती. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते सावंतवाडीतील आंबोली घाटात आला असता मृतदेहासह तो डोंगराच्या उतारावरून खाली पडला. मात्र, त्याच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती बचावली.
पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून भाऊसो माने आणि त्याचा साथीदार तुषार पवार (28) यांनी रविवारी सुशांत खिलारे (30) याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. तिघेही साताऱ्यातील कराड येथील रहिवासी आहेत. मित्राच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी माने आणि पवार कारमधून 400 किमी अंतरावरील आंबोली घाटावर गेले. घाटात माने यांचा तोल गेला आणि मृतदेहासोबत पडून अपघातात त्याचा मृत्यू झाला. (वाचा - Pune Road Accident: Google Maps वर रस्ता शोधणं इंजिनियर तरूणीच्या जीवावर बेतलं; मुंबई-बंगळुरू हायवेवर ट्रकच्या धडकेत मृत्यू)
यानंतर भाऊसो माने यांच्यासोबत गेलेल्या तुषार पवार याने कुटुंबीयांना फोन करून सर्व प्रकार सांगितला आणि गुन्ह्याची कबुली दिली. मंगळवारी एका स्थानिक व्यक्तीने मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. उपनिरीक्षक अमित गोटे यांच्यासह बचाव कर्मचार्यांनी एकमेकांपासून थोड्याच अंतरावर असलेले दोन मृतदेह बाहेर काढले.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आंबोली घाटात राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो आणि एकेकाळी हे ठिकाण मृतदेह टाकण्यासाठी कुप्रसिद्ध होते. त्यानंतर येथे अनेक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात सापडलेले दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.