पुण्यामध्ये आज आंबिल ओढा (Ambil Odha) परिसरात पोलिसांनी नागरिकांच्या घरावर जेसीबी घुसवत कारवाई केल्याने नागरिक आणि पोलिसांमध्ये राडा झाल्याचं दृश्य बघायला मिळालं आहे. दरम्यान ही कारवाई विना नोटीस केल्याचा स्थानिकांचा दावा आहे तसेच याचा निषेध करण्यासाठी काही नागरिकांनी रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला आहे.
आंबिल ओढा हा पुण्यातील जुना ओढा आहे. कात्रज तलावापासून त्याची सुरूवात होते. सध्या बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट आहे आणि त्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांच्या घरांवर हातोडा मारला जात आहे असा स्थानिकांचा दावा आहे. दरम्यान या घटनेचे राजकीय पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याप्रकरणी तातडीने दखल घेत एक बैठक बोलावली आहे.
सध्या आंबिल ओढ्यामध्ये राहणारे नागरिक मागील 50 वर्ष येथेच राहत आहेत. ऐन पावसाळ्यात अशी घरांवर कारवाई झाली तर बेघर झालेल्यांनी रहायचं कुठे हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. योग्य पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करा अशी स्थानिकांची मागणी आहे. दरम्यान आज सकाळी आंबिल लोढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे पोलिसांसह पालिका अधिकारी पोहोचले असताना स्थानिकांनी ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’अशा घोषणा देत कारवाईला प्रखर निषेध दर्शवला आहे.