मनसे विद्यार्थी सेना (MNS Vidyarthi Sena) उल्हासनगर (Ulhasnagar ) शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर अज्ञातांनी तलवार हल्ला (Sword Attack ) केला. ही घटना आज (8 ऑक्टोबर) सकाळी घडली. या हल्ल्यात शेलार (Manoj Shelar) यांच्या हाताला दुखापत झाली झाली असून, रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना सोडण्यात आल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, अंबरनाथ (Ambernath ) येथील शिवमंदिर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना मनोज शेलार यांच्यावर हा हल्ला झाला. शेलार यांनी उल्हासनगर महापालिकेतील शिक्षण मंडळाचे घोटाळे उघड केल्यानेच अज्ञातांकरवी आपल्यार तलवार हल्ला केल्याचा दावा शेलार यांनी केला आहे.
मनोज शेलार यांच्यावर झालेल्या तलवार हल्ला प्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रितसर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासास सुरुवात करतील. दरम्यान, पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवत मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करावी अशी मागणी स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. (हेही वाचा, नाशिक: पहाटे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला; जागीच मृत्यू)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. उल्हासनगर येथील राणी लक्ष्मीबाई ही शाळा पटसंख्ये अभावी बंद पडण्याच्या स्थितीत होती. शाळेची इमारतही मोडकळीस आली होती. परिसरातील काहींनी या शाळेतीर साहित्य बांधकाम तोडून नेले. इतकेच नव्हे तर शाळा परिसरातच नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली होती. या मुद्द्यावर शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या नेतृत्वाखाली आवाज उढवला होता. तसेच, या प्रकाराची माहिती प्रसारमाध्यमांनाही दिली होती. त्यातूनच हे कृत्य झाल्याचा दावाही मनोज शेलार समर्थकांकडून करण्यात येतो आहे.