अंबरनाथ, बदलापुरात वीज पुरवठा ठप्प, आठवडाभरात तिसऱ्यांदा वीज खंडित झाल्याने नागरीक हैराण
(PIC Credit - Pixabay)

एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना विजेची मागणी वाढत असताना बदलापूर आणि अंबरनाथमध्ये (Ambarnath) वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पडघा केंद्रातून अंबरनाथ आणि बदलापूर (Badlapur) शहरात येणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने अंबरनाथ, बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजपुरवठा रविवार सकाळपासून खंडित झाला आहे. गेल्या आठवडाभरात तिसऱ्यांदा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा - E- Bus Service: कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरात धावणार ई बस, एकात्मिक परिवहन योजना राबविणार)

आठवडाभरापासून पडघा येथील केंद्रातून मोरीवली उच्चदाब विद्युत वाहिनीत सातत्याने बिघाड होत असल्याने अंबरनाथ, बदलापूर या शहरांना आणि ग्रामीण भागाला खंडित वीज पुरवठ्याला फटका बसतो आहे. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून पडघा ते मोरिवली या उच्चदाब विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला. परिणामी अंबरनाथ शहराचा मोठा भाग, बदलापूर शहर आणि अंबरनाथ तालुक्याच्या बारवी धरणापर्यंत भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एकीकडे तापमानात चांगलीच वाढ झाल्याने त्यामुळे विजेची मागणी वाढली असून पंखे, वातानुकूलित यंत्रणा अधिक प्रमाण वापरली जाते आहे. असे असताना वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.

होळीच्या दिवशी सुमारे चार तास आणि गुरुवारी रात्री सुमारे सहा तास वीज पुरवठा खंडित झाला होता. मोरिवलि फिडर मध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून तांत्रिक बिघाड शोधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत नागरिकांना दिलासा देण्यासाठी चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा केला जात असल्याचेही सांगितले आहे.