
अमरावती (Amaravati) च्या दर्यापूर (Daryapur) पासून 5 किमी अंतरावर असलेल्या लाखापूर (Lakhapur) फाट्याजवळ कापूस वेचणार्या मजूरांच्या ट्रक्टरची आणि आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद खालिक यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर 5 मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात काल ( 22 डिसेंबर) रात्रीचा आहे.
दर्यापूर मध्ये एका शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर दर्यापूरला येत होत्या यावेळी त्यांच्या समवेत आमदार बळवंत वानखडे व काँग्रेस पदाधिकारी होते. वानखेडे यांचे वाहन त्यांच्या ताफ्यात आले. ट्रॅक्टर मधून मोहम्माद खालिक शेत मजुरांसोबत प्रवास करत होते. वानखेडेंच्या वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. मजुरांपैकी 5 जण जखमी आहेत. सध्या त्यांच्यावर अमरावती, दर्यापूर मध्ये उपचार सुरू आहेत.
आमदार वानखेडे यांनी मीडीयाला दिलेल्या माहितीनुसार, ' वानखेडे हे यशोमती ठाकूरांसोबत जाण्यासाठी त्यांच्या गाडीत गेले. त्यांच्यासोबत चालक आणि सचिव होता. '
दर्यापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर लखापूर फाट्याजवळ मजुरांचा ट्रॅक्टर शेताजवळ उभा होता. ट्रॅक्टरचे ‘टेललाइट’ बंद होते आणि त्याला ‘रिफ्लेक्टर’ही नव्हते. त्यामुळे वानखडे यांच्या वाहनावरील चालकाची नजरचूक झाली व अपघात घडला. यामध्ये वानखेडेंच्या वाहनाचा पुढला भाग चेपला गेला आहे. वानखेडे यशोमतींच्या गाडीमध्ये असल्याने ते यामधून सुदैवाने बचावले आहेत.