Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2020: यंदाच्या साहित्य संमेलनात धार्मिक वाद; ना.धो. महानोर यांना उद्घाटनाला उपस्थित न राहण्याचा इशारा
प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो सौजन्य-फेसबुक)

सालाबादप्रमाणे या वर्षीचे म्हणजे 2020 मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) हे उस्मानाबाद (Osmanabad) येथे पार पडणार आहे. उद्या पासून सुरु होणारे 2020 मधील हे 93 वे संमेलन असणार आहे. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासू जुळले असल्याने, आता या साहित्य संमेलनाबाबत एक धार्मिक वाद उफाळून आला आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. मात्र त्यांना ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहू नये, असा इशारा दिला आहे.

याबाबत एक पत्र ब्राह्मण महासंघाने ना.धो. महानोर यांना लिहिले आहे. उद्यापासून उस्मानाबाद  येथे साहित्य संमेलन सुरु होत आहे. साहित्य संमेलनाच्या ठिकाणी 150 ख्रिस्त धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत, याच गोष्टीला ब्राह्मण महासंघाचा विरोध आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्यिक नसून धर्मप्रसारक आहेत असा महासंघाचे म्हणणे आहे. तसेच याआधी बुलढाणा साहित्य संमेलनावेळी हे संमेलन एका आश्रमाच्या जागी होत आहे, हे कारण सांगून अंनिसने ती जागा बदलायला भाग पाडले होते. मात्र आता ख्रिस्ती धर्मगुरूंना साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची परवानगी कशी दिली? असा सवालही महासंघाने उपस्थित केला आहे.

या गोष्टीचे गांभीर्य पाहता, गृहमंत्र्यांनी ताबडतोप पोलीस संरक्षणाचे आदेश दिले आहेत, मात्र उद्याच्या संमेलनासाठी महानोर उस्मानाबाद येते दाखल झाले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, 'ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नावाने पत्र आले आहे. त्यांचे उस्मानाबादला जाऊ नका सांगणारे फोन आले आहेत. मात्र मी साहित्य संमेलनात येणार, असा शब्द दिला आहे. त्यामुळे मी साहित्य संमेलनात सहभागी होणार आहे.' (हेही वाचा: जेष्ठ कवी, पद्मश्री ना. धों. महानोर करणार 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन)

दरम्यान, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ उद्या दिनांक 10 जानेवारी रोजी होत आहे. यासाठी संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना. धो. महानोर व संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे उस्माबाद येथे दाखल झाले आहेत. संमेलन शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर होत आहे. उद्या सकाळी भव्य शोभायात्रा व ग्रंथिंदडीने साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे.