Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

दिल्ली (Delhi) प्रमाणेच महाराष्ट्रात (Maharashtra) सुद्धा शंभर युनिट पर्यंत वीज मोफत (Free Electricity)  देण्याच्या विचाराधीन असल्याचे काही दिवसांपूर्वी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याकडून सांगण्यात आले होते मात्र यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी प्रतिक्रिया देत असले फुकटचे धंदे राज्य सरकारने करू नये अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच उद्योगांना विजेसाठी आकारण्यात येणाऱ्या दराबाबत राज्य सरकारकडून आढावा घेण्यात येत आहे. वीजदरावर आकारण्यात येणाऱ्या करात कपात करायाची झाल्यास राज्य सरकार किती भार सोसू शकते, हे आधी पाहून मग पुढील निर्णय घेतला जाईल असेही अजित पवार यांनी सांगितले. खुशखबर! महाराष्ट्रात लवकरच 100 युनिट्स पर्यंत मोफत वीज; प्रस्तावाचा विचार सुरु, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

प्राप्त माहितीनुसार, उर्जा मंत्रालय सध्या राज्यातील विजेचा दर कमी करणे, शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवणे आणि 100 युनिट्सपर्यंत मोफत वीज देणे या तीन मुद्द्यांवर चर्चा करत आहे. याबाबात ग्राहक संघटनांशी सुद्धा चर्चा झाली आहे. तसेच येत्या वर्षाअखेरी पर्यंत ही योजना लागू करण्याचा ऊर्जा मंत्र्यांचा विचार आहे. हा निर्णय झाल्यास या योजनेसाठी दर वर्षी सुमारे 7 हजार 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, 'महावितरण' आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती पाहता हा भार कोण सोसू शकणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. किंबहुना यामुळेच अजित पवार यांची या प्रकारची प्रतिक्रिया समोर येत असल्याचे दिसतेय.

दरम्यान, काल अजित पवार यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीत वीज दराबाबत चर्चा केली. यावेळी अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा वीजेवरील कर कपात करून, वीज स्वस्तात देणे शक्य होईल का, अशी मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी 'मोफत विजे'च्या मुद्द्यावर ही प्रतिक्रया दिली. उपमुख्यमंत्र्यांची या निर्णयाच्या बाबतीतील भूमिका पाहता हा निर्णय कितपत पुढे चर्चिला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.